नाश्ता हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. नाश्ता हा पोटभर करावा जेणेकरून दिवसभर धावपळ करण्यासाठी ऊर्जा शरीरात राहते असे सांगितले जाते. नाश्त्यामध्ये आपल्याकडे सहसा शिरा, पोहे, उपीट किंवा शेवयांचा उपमा असे पदार्थ असतात जे झटपट तयार होतात. इडली, वडा सांबार, इडली चटणी, डोसा, सँडविच हे पदार्थ तयार करण्यासाठी तसा वेळ लागतो त्यामुळे सुट्टीच्या दिवशीच असे पदार्थ बनवले जातात. तुम्हाला जर रोजचे शिरा-पोहे-उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक झटपट तयार होणारी एक सोपी रेसिपी आहे. तुम्ही बेसन आणि कच्चा बटाटा वापरून हा त्याचा चविष्ट नाश्ता तयार करू शकता. चला मग जाणून घेऊ या कच्चा बटाटा आणि बेसनचा खमंग नाश्ता कसा बनवायचा ते….

कच्चा बटाटा आणि बेसनचा खमंग कुरकुरीत नाश्ता रेसिपी

कच्चा बटाटा आणि बेसनचा खमंग कुरकुरीत नाश्तासाठी लागणारे साहित्य

  • बटाटे २ मोठे
  • बेसन ४ टी स्पून
  • रवा १ टी स्पून
  • लसूण पाकळ्या ८-१०
  • आलं १/२ इंच
  • जिरे १ टी स्पून
  • ओवा १/२ टी स्पून
  • मिरेपूड १/२ टी स्पून
  • चिली फ्लेक्स १ टी स्पून
  • हळद १/२ टी स्पून
  • चाट मसाला १ टी स्पून
  • मीठ
  • कोथिंबीर

हेही वाचा –पितृपक्षात बनवा खमंग थापीववडी! झटपट नोट करा पातवडीची अत्यंत सोपी रेसिपी

कच्चा बटाटा आणि बेसनचा खमंग कुरकुरीत नाश्ताबनवण्याची कृती

  • प्रथम एका खलबत्यामध्ये लसूण, आले आणि जिरे टाकून जाडसर कुटून घ्या. त्यानंतर एका वाटीत हे वाटण काढून घ्या.
  • बटाट्याची साल काढून किसून घ्या. त्यात पाणी घालून दोन वेळा धूवून घ्या. हाताने पिळून त्यातील पाणी काढून एका भांड्यात बटाट्याचा किस काढा.
  • आता त्यात बेसन, रवा आणि लसूण आले आणि जिरेचे वाटण घाला. त्यात मिरेपूड, ओवा, चिली फ्लेक्स(किंवा लाल तिखट), चाट मसाला, मीठ, आणि कोथिंबीर घाला आता हे सर्व एकत्र करून घ्या. त्यात थोडे पाणी घाला.
  • आता तवा गरम करून त्यावर तेल टाका आणि त्याचे धिरडे किंवा कटलेट सारखा आकार देऊन दोन्ही बाजूने भाजून घ्या.

हेही वाचा – सांगली साताऱ्याची प्रसिद्ध लाटीवडी! मैदा न टाकता झटपट बनवा पारंपारिक पदार्थ, ‘ही’ घ्या रेसिपी

गरमा गरम बेसन आणि बटाट्याचा नाश्ता तयार आहे. सॉस किंवा चटणीबरोबर तुम्ही ते खाऊ शकता.