Pomfret Achari Recipe In Marathi: मच्छीचा वार आला की कोकणी- मालवणी घरांमध्ये भलताच उत्साह असतो. चिकन- मटणचे कितीही कौतुक असले तरी मच्छीला कशाचीच तोड नाही हे ही तितकं खरं आहे. म्हणूनच बहुतांश वेळा एक किलो चिकनपेक्षाही मच्छीचा भाव जास्तच असतो. त्यात पापलेट- सुरमई घ्यायची म्हणजे जरा खिशाला पण विचार करावा लागतो. तुम्ही एवढ्या आवडीने ही मच्छी घेणार पण पुन्हा तोच तोच मच्छीचा सार आणि तळलेले साधे तुकडे खायचे हे थोडं चुकीचं वाटतं नाही का? याच पापलेट फ्रायला तुम्हाला आचारी टिक्का फ्लेव्हर देता आला तर.. हो हो अगदी घरच्या घरीच! आज आपण लोकसत्ता पूर्णब्रम्हच्या किनारी खाद्य मासिकातील खास पापलेट लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत. तुमच्या घरच्यांना व स्वतःच्या जिभेला येत्या मच्छीच्या वारी खास सरप्राईझ द्यायला विसरु नका.
पापलेट लोणचं कसं बनवाल?
साहित्य: १ मध्यम आकाराचा पापलेट, अर्धा इंच आलं, १५- १६ लसणाच्या पाकळ्या, १ हिरवी मिरची, अर्धी वाटी कोथिंबीर, २ मोठे चमचे लाल तिखट व गरम मसाला, ३ लिंबू, पाव मोठा चमचा हळद, लोणच्याचा मसाला, १ ते दीड वाटी तेल, मीठ चवीनुसार
पापलेट लोणचं कृती:
एका बाऊलमध्ये तुमच्या आवडीनुसार पापलेटचे लहान-मोठे तुकडे करून घ्या. या पापलेटच्या तुकड्यांना गरम मसाला, तिखट किंवा साठवणीतला मसाला लावून घ्या.
या पापलेटच्या तुकड्यांना मिरच्या, कोथिंबिर व लसूण-आल्याचं हिरवं वाटण लावून घ्या. चवीप्रमाणे मीठ घाला.
पापलेटचे तुकडे गरम पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल लावून १०- १५ मिनिट शिजवून घ्या.
हे ही वाचा<< Video: १५ मिनिटात तयार करा पोह्याचा जाळीदार दावणगिरी डोसा; पीठ आंबवण्याची कटकटच नाही
आता आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी आपण बाजारातून आणलेला मसाला एक ते दीड वाटी तेलात नीट मिसळा.
एक सोपी टीप म्हणजे तुम्ही जेवढा मसाला घेणार आहात त्याहून अर्धा वाटी जास्त तेल घ्या.
हे ही वाचा<< Video: मिरची कापल्यावर हाताची आग होते? जाळ घालवण्यासाठी पाहा ‘हे’ ५ स्मार्ट उपाय
तेल जास्त गरम करू नका. यात मसाला लावून घेतलेले पापलेट टाकून शिजवून घ्या.
ही रेसिपी तांदळाच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसह अगदी चविष्ट लागते. नक्की ट्राय करून पाहा व कशी झाली हे कमेंट करून नक्की कळवा.