[content_full]
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
घराच्या मागच्या अंगणात अळवाचे दोन कांदे सुखानं एकत्र नांदत होते. एकाच मातीतलं वाटून खायचं, एकमेकांच्या वॉटरबॅगमधलं पाणी प्यायचं, किड्यामुंग्यांपासून एकमेकांना वाचवायचं, सकाळी डोकावून बाहेर बघायचं आणि अंधार पडला की मातीचं पांघरूण घेऊन छान झोपून जायचं, हा त्यांचा दिनक्रम. एके दिवशी दोघांनाही कोंब फुटले. ते फुटण्यात काही तासांचं अंतर होतं, म्हणून एक झालं धाकटं अळू आणि दुसरं झालं थोरलं. दोन्ही कोंब वाढत गेले आणि त्यांना आणखी कोंब फुटले. त्यातून अळवाच्या जाड देट्या तयार झाल्या, त्यांना पानं फुटली आणि ती पसरली, वाढली. मग त्या देट्यांना शिंगं फुटली. कोण जास्त मोठं, कुणाची पानं जास्त रुंद, सुंदर, याच्यावरून स्पर्धा सुरू झाली. थंडीचे दिवस होते. एके दिवशी सकाळी पानांवर दव पडलं. धाकट्या अळवाला त्याचा गर्व झाला. त्याला वाटलं, आपल्या अंगावर मोतीच उगवलेत. मोठं अळू मात्र शांत होतं. त्याच्याही अंगावर असे मोती जमा झाले होतेच, पण त्याला गर्व झाला नव्हता. धाकट्यानं लगेच थोरल्याला चिडवायला सुरुवात केली. आपल्याच अंगावरचा मोती जास्त मौल्यवान आणि सुंदर, असं त्याला वाटायला लागलं होतं. त्या निमित्तानं मनात दडून बसलेल्या काही दिवसांच्या कटू भावनाही ओठांवर आल्या. तरीही थोरल्यानं प्रतिक्रिया दिली नाही. त्याचं आपलं नेहमीचं काम सुरू होतं. उन्हं वर आली, पानं हलायला लागली, तशी मोतीसुद्धा इकडे तिकडे व्हायला लागले. सूर्यप्रकाशाच्या दिशेनं पानांनी माना जरा वर केल्या आणि काही मोतीही टपाटप गळायला लागले. अजूनही धाकट्याचा गर्व काही कमी होत नव्हता. अचानक कुणीतरी दोन्ही अळवांच्या पानांना गदगदा हलवतंय, अशी जाणीव झाली आणि काही लक्षात यायच्या आत मालकानं पानं आणि देटी दोन्ही कापून टोपलीत भरली. अळूवड्या तयार होऊन डिशमध्ये उतरल्या आणि थोड्याच काळात पाहुण्यांच्या जिभेवरही पडल्या. एका पाहुण्यानं एकदम तोंडातला घास बाहेर काढला, गटागटा पाणी प्यायलं. “कशीतरीच लागतेय वडी!“ त्यानं एकदम तोंड वाकडं केलं. “हो का? अरे देवा! खाजरं दिसतंय अळू!“ मालकीणबाई म्हणाल्या आणि त्यांनी `ह्या खाऊन बघा,` म्हणत दुसऱ्या वाडग्यातल्या वड्या त्यांच्यासमोर ठेवल्या. पाहुण्यानं त्या चवीनं खाल्ल्या. `ह्या धाकट्याची खाज अजून जात नाही!` थोरल्यानं तोंडात पडल्यापडल्या प्रतिक्रिया व्यक्त केली.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- अळूवड्यांची आठ पाने (भाजीचं आणि वड्यांचं अळू वेगळं असतं, ते पारखून, विचारून घ्यावं.)
- १ वाटी हरभरा डाळीचे पीठ
- १ चमचा कॉर्नफ्लोअर
- चवीनुसार मीठ
- जिरं २ छोटे चमचे
- पांढरे तीळ १ छोटा चमचा
- चिंचेचा कोळ १/४ वाटी
- २ चमचे किसलेला गूळ
- तळण्यासाठी तेल
- ओलं खोबरं १/२ वाटी
- 2 चमचे लाल तिखट
- चिमूटभर हळद
- चिमूटभर हिंग
- ओलं खोबरं
- कोथिंबीर
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- डाळीच्या पिठात कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, मीठ, तीळ, जिरे, हळद, हिंग, चिंचेचा कोळ, गूळ घालून एकजीव करून घ्यावे.
- थोडे पाणी घालून घट्टसर भिजवून घ्यावे. खार पातळ करू नये.
- अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. देठ कापून टाकणे. पानाच्या मागील बाजूवर मिश्रणाचा पातळ थर हाताने पसरावा.
- त्यावर दुसरे पान उलटे ठेवावे आणि मिश्रण पसरावे.
- अशा प्रकारे एकावर एक 4 पानांवर मिश्रण पसरून दोन्ही बाजूने आत पान दुमडून छान रोल करावा.
- रोल करताना मध्ये मध्ये मिश्रण लावावे.
- कूकरच्या भांड्याला तेल लावून रोल ठेऊन कुकरमध्ये शिट्टी न लावता १०-१५ मिनिटे वाफेवर रोल शिजवून घ्यावा.
- शिट्टी लावल्यास 3 ते 4 शिट्ट्या कराव्यात.
- कूकरमध्ये न लावता ढोकळ्याप्रमाणे बाहेरही शिजवता येतो.
- थंड झाल्यावर उभे काप करून गरम तेलात कुरकुरीत तळून घ्यावे किंवा शॅलो फ्राय करून घ्यावे.
- ओलं खोबरं आणि कोथिंबीर पसरवावी.
[/one_third]
[/row]