[content_full]
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपल्या (घोड्यासारख्या वाढलेल्या) बॉयफ्रेंडला `बेबी`, `बच्चा,` `हनी,` `शोना`, `राजू` वगैरे म्हणायची हल्ली पद्धत आहे म्हणे. तो जेवढा जास्त आडदांड, खवीस, निगरगट्ट, आडवातिडवा असेल, त्यावरून ही विशेषणं जास्त प्रेमानं वापरली जातात, असंही काही तज्ज्ञ सांगतात. गर्लफ्रेंडला काय काय म्हटलं जातं, त्याची चर्चा इथे न केलेलीच बरी. तर, ह्या `बेबी`ला त्याच्या बेबीला खूश ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, (स्वतःच्या) सहनशक्तीची परीक्षा आणि कधीकधी सद्सद्विवेकबुद्धीचा कडेलोटही करावा लागतो, असंही तज्ज्ञ सांगतात. आनंदात कसं जगावं, संभाषण कसं करावं, प्रभावी कसं बोलावं, यशस्वी कसं व्हावं, याची पुस्तकं आणि क्लासेस अमाप असले, तरी गर्लफ्रेंडला खूश कसं ठेवावं, याची शिकवणी देणारी पुस्तकं आणि वर्ग मात्र शंभराच्या नोटांप्रमाणेच अत्यल्प असावेत, असं वाटतं. आणि असले, तरी ते प्रत्यक्ष आयुष्यात वापरण्याजोगे नक्कीच नसणार. प्रत्येक गर्लफ्रेंडची तऱ्हा वेगळी असते. काही गर्लफ्रेंड कॉस्मेटिकफ्रेंडली असतात, तर काही फिल्म आणि `हॅंगिंग आउट`फ्रेंडली असतात. काही फेसबुकसॅव्ही असतात, तर काही गिफ्ट addict असतात. त्या त्या गर्लफ्रेंडच्या आवडीनिवडीनुसार तिला सांभाळावं लागतं. एकवेळ विरोधी पक्षांना आणि आपल्या पक्षातल्या विरोधकांना सांभाळणं सोपं, पण गर्लफ्रेंडचा मूड सांभाळणं खूप अवघड असतं, असं तज्ज्ञ सांगतात. या अग्निदिव्यातून आपण (म्हणजे तो बॉयफ्रेंड!) पार पडू शकलो, तर त्याला `बेबी, बच्चा` वगैरे नामाभिधान (आणि आणखी बरंच काही काही) मिळतं, असंही तज्ज्ञ सांगतात. बरं, आपल्या बेबीला खूश ठेवायला ह्या पुरुष बेब्यांना आपण सर्वगुणसंपन्न असल्याचंही सिद्ध करावं लागतं. दरवेळी नवीन रेस्टॉरंटमध्ये जाण्यासारखी परिस्थिती असतेच, असं नाही. त्यातून सध्याच्या सुट्या पैशांच्या टंचाईच्या काळात किती दिवस काटकसर करणार? म्हणूनच झटपट तयार होणारा असा एखादा पदार्थ शिकून घेणं जास्त श्रेयस्कर. म्हणजे, डोक्याचं भजं होण्याची शक्यता कमी होते. तर, अशा अनेक `बेब्यां`च्या (कृपया अनुस्वारात गल्लत करू नये!) सहनशक्तीला, धीरोदात्तपणाला आणि स्थितप्रज्ञतेला सलाम करत आज शिकूया, बेबी कॉर्न पकोडा!
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- २५ बेबी कॉर्न
- ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर
- दीड वाटी मैदा
- १/४ टी स्पून हळद
- १ इंच आले
- १ टी स्पून लाल तिखट
- २ हिरव्या मिरच्या
- चवीपुरते मीठ
- तळणीसाठी तेल
- दही २ टी स्पून
- चिमूटभर खाण्याचा सोडा
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- बेबी कॉर्न धुवून साफ कपड्याने पुसून घ्यावेत.
- मध्ये उभा काप देऊन बेबी कॉर्न अर्धे करून घ्यावेत.
- सर्व बेबीकॉर्नवर मीठ भुरभुरावे आणि बाजूला ठेवावेत.
- दही, आलं आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट करावी.
- एका भांड्यात कॉर्नफ्लोअर आणि मैदा चाळून घ्यावे.
- त्यात पेस्ट, मीठ, सोडा, लाल तिखट, हळद, घालून चांगले मिक्स करावे.
- आवश्यकतेनुसार पाणी घालून इडलीच्या पीठासारखे भिजवावे.
- मीठ लावलेले बेबीकॉर्न धुवून घ्यावेत.
- कढईत तेल तापवावे. तेल व्यवस्थित तापले कि आच मध्यम करावी.
- कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणात बेबी कॉर्न घोळवून गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत. अशा प्रकारे सर्व बेबी कॉर्न तळून घ्यावेत.
टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावेत.
[/one_third]
[/row]