[content_full]
“किती वेळ व्हॉटस अॅपवर बसलेयंस?“ तो तिच्यावर वैतागला होता. “हो रे, झालंच आहे. आलेच!“ तिनं मोबाईलमधून मानही वर न करता उत्तर दिलं. त्याची सहनशक्ती आता संपत चालली होती. खरंतर नेहमीच्या वेळेपेक्षा आज तो लवकर घरी आला होता. बायको आपल्याला मखरात बसवणार नाही, पण निदान आपलं हसून स्वागत करेल, संध्याकाळचा चहा घरीच घेता येईल, त्याबरोबर ती काहीतरी छानसं चटपटीत खायला करेल, अशा त्याच्या अपेक्षा होत्या, पण तीच घरी नव्हती. तिनं फोनही उचललला नाही. कधीतरी सात साडेसातला ती घरी आली, तेव्हाही सगळी कहाणी ऐकल्यानंतर तिला फार काही फरक पडल्याचं जाणवलं नाही. नवरा लवकर घरी आल्यामुळे त्याचं कोडकौतुक करणं सोडाच, तिनं फारशी काही दखलही घेतल्याचं जाणवलं नाही. त्यातून आल्यापासून ती मोबाईलमध्येच तोंड खुपसून बसली होती. त्यामुळे त्याच्या पाऱ्याचा आता स्फोट व्हायला आला होता. पोटात भुकेनं कावळे ओरडायला लागले होते. शेवटी कधीतरी नऊ सव्वानऊला तिनं मोबाईल बाजूला ठेवला आणि ती त्याच्याकडे वळली. “अरे, एका जुन्या मित्राशी बोलत होते. तो पहिल्यांदा यूएसहून इथे आलाय. आमचं भेटायचं चाललंय उद्या.“ या उत्तरावरून तो आणखी भडकला. “जेवणाची काय कंडिशन आहे आज? बाहेरून मागवायचंय की बाहेर जायचंय?“ त्यानं विचारलं. “बाहेर नाही, आत जायचंय. किचनमध्ये.“ ती हसू दाबत बोलली. आत गेल्यावर त्याचा निम्मा राग आधी बेसन पोळ्यांच्या घमघमाटानं आणि नंतर उरलेला निम्मा राग उदरभरणानं शांत झाला. “तू उद्या जाणारेस ना तुझ्या जर्मनीहून आलेल्या मैत्रिणीला भेटायला? तिच्यासाठीही केल्यायंत थोड्या बेसन पोळ्या. जाताना आठवणीनं घेऊन जा!“ तिनं स्थितप्रज्ञपणे सांगितलं आणि त्याच्याकडे रोखून बघत राहिली. `हं` म्हणून त्यानं चेहऱ्यावर गांभीर्य आणायचा प्रयत्न केला, पण गालातल्या गालात हसणं काही त्याला आवरता आलं नाही.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- एका नारळाचं खोवलेलं खोबरं
- तेवढीच साखर
- दोन छोटे चमचे दूध
- अर्धी वाटी बेसनपीठ
- एक वाटी लाडू रवा
- एक चमचा मैदा
- तेल
- चवीपुरतं मीठ
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- खोबरं, साखर आणि दूध एकत्र करून विरघळवून गॅसवर गरम करून सारण तयार करून घ्या.
- वेगळ्या भांड्यात अर्धी वाटी बेसन थोड्याशा तेलावर भाजून घ्या. ही दोन्ही मिश्रणं साधारण अर्धा तास गरम होण्यासाठी वेगळी ठेवा.
- लाडू रवा, मैदा एकत्र करून त्यात तेल आणि मीठ घालून त्याची कणीक भिजवून ठेवतो तशी अर्धा तास भिजवून घ्या.
आधीचं खोबऱ्याचं आणि बेसनाचं सारण एकत्र करून घ्या. - कणकेची पारी करून त्यात सारण भरा. फुलक्याएवढी पोळी लाटा आणि तव्यावर खमंग भाजा. भाजताना वरून तूप सोडल्यास पोळी आणखी खुसखुशीत होते.
[/one_third]
[/row]