[content_full]
“आजी, खूप भूक लागलेय. काहीतरी मस्त खायला दे ना!“ आम्ही मुलं लहानपणी आजीकडे हट्ट करायचो. मग आजी आम्हाला लाडू, चिवडा घरात आहे तो खा, असं सांगायची. फराळाचे पदार्थ फक्त दिवाळीला आणि मिठाई फक्त सणासुदीला किंवा पगारवाढ आणि बोनसच्या वेळी, एवढंच गणित तेव्हा माहीत होतं. “आज सहज चितळ्यांच्या दुकानावरून गेलो, पार्किंगला जागाही होती, म्हणून गाडी लावून आत गेलो आणि काजूकतली घेऊन आलो,“ हा प्रकार तेव्हा नव्हता. कुठलीही मिठाई किंवा गोडाचा पदार्थ आणायला `पार्किंगला जागा होती म्हणून, सहज वेळ होता म्हणून,` याच्यापलीकडे बरंच मोठं निमित्त लागायचं. अनेकदा हे निमित्त परीक्षेतल्या गुणांशी जोडलेलं असायचं आणि घरी काही गोडधोड, चमचमीत आणण्याचं निमित्त आणि परीक्षेतले गुण हे प्रमाण नेहमीच व्यस्त असायचं. तर सांगायचा उद्देश काय, की फराळाचे पदार्थ किंवा बाहेरून आणलेलं सटरफटर खाणं घरात कायमचं वस्तीला नसायचं. फ्रीज हीसुद्धा चैन होती, तर तो मस्का, बटर, चीजनं भरलेला असण्याची शक्यताही नव्हती. तरीही कुठले ना कुठले लाडू आणि चिवडा हे प्रकार आलटून पालटून स्वयंपाकघरात आनंदानं नांदत असायचे. कधी कुणाच्या लग्नामुंजीतून आलेलं पार्सलही वाट बघत असायचं. तरीही, संध्याकाळी आल्यावर काहीतरी वेगळं आणि चटकदार खायला हवं, हे ठरलेलं असायचं. मग आजी `थांबा हं, काहीतरी करते मी,` असं म्हणून पोह्याचाच एखादा पदार्थ करायची. खरंतर तिची पहिली पसंती दूधपोहे, दहीपोहे ह्यालाच असायची, पण ते कालपरवाच झालंय, अशी तक्रार नको म्हणून मग उभा चिरलेला कांदा घालून परतलेले पोहे किंवा दडपे पोहे, असा पर्याय मिळायचा. अधूनमधून भाजलेलं गव्हाचं पीठ दुधात कालवून, गूळ घालून खायला दिलं जायचं किंवा पोहे भाजून, चुरून आणि त्यात गव्हाचं पीठ, गूळ घालून आजी मस्त लाडू बनवायची. दमून भागून आल्यानंतर आजीच्या हातचं हे साधंच पण मस्त, वेगळं खाणं खायला खूप मजा यायची. आता घरं आधुनिक झाली. मुलांचे हट्ट आधुनिक झाले आणि आज्याही आधुनिक झाल्या. आत्ताच्या आज्यांनी कितीही प्रेमानं दूधपोहे दिले, तरी ते नातवंडांना कितपत आवडतील, हा प्रश्नच. तर, अशा आधुनिक आज्यांसाठी आणि आयांसाठीही आपल्या मुलांना आणि त्यांच्या नावाखाली घरातल्या सगळ्याच भुकेलेल्यांना संध्याकाळच्या वेळी देण्यासाठी हा एक सहज बनणारा, पण चमचमीत पदार्थ. नाव `बाकरवडी चाट` असलं, तरी आपण फक्त `चाट`ची पाकक्रिया शिकूया. बाकरवडी सध्यातरी बाहेरूनच आणावी लागेल हां!
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- २ वाट्या बाकरवडी
- २ कांदे
- चवीनुसार मीठ
- दोन/ तीन चमचे चिंचेची आंबटगोड चटणी
- चाट मसाला
- लाल तिखट
- दही
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- भुजिया शेव किंवा साधी बारिक शेव आपापल्या आवडीप्रमाणे
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- बाकरवड्या हाताने चूरून बारीक तुकडे करावेत. (छोट्या बकरवड्या घेतल्या, तर त्या हाताने चांगल्या बारीक होतात. पण मोठ्या असतील, तर त्या एकदाच मिक्सरमधून काढाव्यात. फार बारीक होऊ देऊ नये.
- एका बाऊलमध्ये बाकरवड्या घ्याव्यात.
- त्यावर कांदा, चिंचेची चटणी, दही, चवीपुरते मीठ, चाट मसाला घालावा.
- कोथिंबिर आणि शेव घालून सजवावे. चाट मसाल्याचा घमघमाट विरायच्या आत फन्ना उडवावा.
[/one_third]
[/row]