मासे, माश्याचे कालवण, फिश फ्राय असे पदार्थ खवय्यांच्या अगदी आवडीचे असतात. खासकरून सुट्टीचा दिवस म्हंटला कि घरात हमखास माश्याचा एखादा पदार्थ बनवला जातो. मात्र काहींना मासे खाऊन तर पाहायचे असतात, पण त्यामध्ये असणाऱ्या काट्यांमुळे माशाचे पदार्थ खायची इच्छा होत नाही. किंवा काट्याची थोडी भीती वाटते. अशा मंडळींसाठी आज आपण खास सुक्क्या बोंबीलच्या चटणीची रेसिपी पाहणार आहोत.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर aartiarke नावाच्या अकाउंटने एक भन्नाट आणि खूप सोपी अशी सुक्क्या बोंबीलची रेसिपी शेअर केली आहे. त्या रेसिपीनुसार ही चमचमीत चटणी कशी बनवायची ते पाहू.
हेही वाचा : Kitchen tips : स्वयंपाक घरातील मच्छीचा वास कसा घालवावा? पाहा या ४ सोप्या टिप्स
सुक्क्या बोंबीलची चटणी :
साहित्य
सुक्के बोंबील
कांदा -२
टोमॅटो – २
लसूण
हिरव्या मिरच्या – ३ ते ४
धणे पावडर
हळद
तिखट
घाटी मसाला
आमसूल/कोकम
कोथिंबीर
मीठ
पाणी
तेल
कृती
- सर्वप्रथम सुक्के बोंबील चांगले ठेचून घ्यावे.
- बोंबील ठेचून झाल्यावर सुरीच्या मदतीने त्याचे मध्यम आकाराचे तुकडे चिरून घ्या.
- आता एका तव्यावर चिरलेले बोंबील काही मिनिटे कोरडे भाजून घ्या. एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये भाजलेले बोंबील थोडावेळ भिजवत ठेवा.
- आता मध्यम आकाराचे कांदे आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. त्याबरोबर हिरव्या मिरच्या आणि लसणीचा अखंड कांदा सालीसकट ठेचून घ्या.
- एका कढईत तेल घालून घ्यावे. तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये ठेचून घेतलेले लसूण आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा.
- कांदा टाकल्यानंतर लगेचच त्यामध्येये चवीनुसार मीठ आणि ठेचलेली हिरवी मिरची घालून घ्या.
- आता कांदा सोनेरी झाल्यानंतर, त्यामध्ये भिजवलेले बोंबील आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून सर्व पदार्थ छान परतून घ्या.
- आता यामध्ये हळद, लाल तिखट, धणे पावडर, घाटी मसाला आणि कोकम घालून सर्व तयार होणारी चटणी चांगली परतून घ्या.
- कढईमध्ये सर्व पदार्थ छान गोळा झाल्यानंतर, त्यावर पाण्याचा हबका मारून, काही मिनिटे कढईवर झाकण ठेवून द्या. काही मिनिटांनी झाकण उघडून त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा चटणीला तेल सुटेपर्यंत झाकून सुकटाची चटणी शिजवून घ्या.
- तयार झालेली चटणी गरम भाकीबरोबर खाण्यासाठी घ्यावी.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर aartiarke नावाच्या अकाउंटने ही सोपी आणि स्वादिष्ट अशी सुक्क्या बोंबीलची चटणी कशी बनवायची याची रेसिपी दाखवली आहे. या रेसिपीला आत्तापर्यंत ७.८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.