[content_full]
…तरीही विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा स्मशानाच्या दिशेने गेला. झाडावर टांगलेले ते कलेवर त्याने आपल्या पाठीवर घेतले आणि तो काटेकुटे तुडवत वाट चालू लागला. थोडं पुढे गेल्यावर प्रेतामधल्या वेताळाने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, “राजा, नित्यनेमानं असं स्मशानात येऊन मला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं, हे काम सोपं नाही. त्यासाठी खूप मेहनत लागत असणार. तू कुठल्या चक्कीचा आटा खातोस?“ विक्रम व्याकरणप्रेमी, भाषाप्रेमी होता, त्यामुळे `तू कुठल्या चक्कीचा आटा खातोस`, याच्याऐवजी `तू कुठल्या गिरणीतून दळून आणलेल्या पिठापासून तयार झालेल्या पोळ्या खातोस,` असं शुद्ध मराठीत वेताळानं बोलायला हवं होतं, असं सांगावंसं त्याच्या तोंडावर आलं, पण विक्रमाने गोष्टीच्या शेवटी बोलायची परंपरा असल्यामुळे तो गप्प बसला. त्यातून वेताळ हा हिंदीत `बेताल` असतो, हेही त्याच क्षणी विक्रमाला आठवून गेलं आणि तो गालातल्या गालात हसला. वेताळ आज कुठलीही गोष्ट सांगणार नव्हता. त्याला फक्त राजाला एकच अवघड प्रश्न विचारायचा होता, की जगातला सगळ्यात चांगला पदार्थ कुठला? पुरुषाला आपल्या आईनं केलेला पदार्थ चांगला वाटतो, बायकोनं केलेला चांगला असला, तरी तशी जाहीर कबुली देण्यात अडचण वाटते. सासू-सुनेला एकमेकींच्या पाककलेचं कौतुक करायचं नसतं, गिऱ्हाइकानं हॉटेलच्या चवीचं कौतुक करण्याआधीच त्याच्या हातात खाण्याचं बिल येऊन पडलेलं असतं. अशा वेळी चांगला पदार्थ कसा ओळखायचा? या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, तर डोक्याची शंभर शकलं होतील वगैरे डायलॉगबाजीही वेताळानं केलीच. विक्रमादित्य म्हणाला, “पदार्थाची चव ही प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते. एखाद्याला आवडणारा सिनेमा दुसऱ्याला आवडेलच असं नाही, तसंच पदार्थाचंही आहे. करणाऱ्याच्या दृष्टीनं सगळ्यात चांगला पदार्थ म्हणजे करायला सोपा असेल, तो. खाणाऱ्याच्या दृष्टीनं जो खायला उत्तम लागेल, ज्याची चव जिभेवर रेंगाळेल तो. आणि डॉक्टरांच्या आणि आहारतज्ज्ञांच्या दृष्टीनं चांगला पदार्थ म्हणजे जो शरीरासाठी हितकारक असेल, तो.“ पाककृतींवरच्या `खाईन तर` या सदरातला असाच एक करायला सोपा, खायला उत्तम आणि चविष्ट असा `ब्रेड पिझ्झा` हा शेवटचा पदार्थ आज बघूया आणि या खाद्यप्रवासाची शंभर पाककृतींची कहाणी सुफळ संपूर्ण करूया!
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- साध्या ब्रेडचे स्लाईस (पिझ्झा चे नाही)
- पिझ्झा सॉस
- टोमॅटो सॉस
- भोपळी मिरचीचे पातळ काप
- कांद्याचे पातळ काप
- टोमॅटोच्या चकत्या
- मिरपूड
- बटर
- अर्धा ते पाऊण कप किसलेले चीज
- चवीनुसार मीठ
- सुक्या लाल मिरच्यांचा चुरा आवडीनुसार (ड्राय रेड चिली फ्लेक्स)
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- ब्रेड स्लाइसला दोन्ही बाजूला बटर लावून एका बाजूने तव्यावर भाजून घ्या.
- भाजलेल्या बाजूला पिझ्झा सॉस लावा. त्यावर टोमॅटो, कांदा आणि भोपळी मिरची घाला, त्यावर मीठ आणि मिरपूड पेरा.
- आवडीनुसार चीज घाला. झाकण ठेवून साधारण १० मिनिटे बेक करा किंवा चीज वितळून किंचित सोनेरी झाले, की लगेच पिझ्झा काढा.
- गरमागरम सर्व्ह करा. सर्व्ह करताना वरून टोमॅटो सॉस आणि चिमूटभर ड्राय रेड चिली फ्लेक्स पसरा.
- यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या उदा. स्वीट कॉर्न, ऑलिव्ह, पनीर इ. घालून ब्रेड पिझ्झा बनवू शकता.
[/one_third]
[/row]