[content_full]
“माझ्यासारखी सुंदर आणि चविष्ट मीच! जगात दुसरा कुठलाच पदार्थ चवीच्या बाबतीत माझा हात धरू शकत नाही!!“ फोडणीच्या पोळीला प्रचंड गर्व झाला होता. फोडणीची पोळी हा प्रकार मूळ पोळीपेक्षा भन्नाट लागतो, याबद्दल कुणाचंच दुमत नव्हतं. ती सगळ्यांची आवडतीही होती. पण तरीही रोजरोज तिच्या किती आरत्या ओवाळत बसायचं, हा मुद्दा होता. फोडणीच्या पोळीचा गर्व दिवसेंदिवस वाढत चालला होता. पोळ्या हा घरातला अगदी आवश्यक आणि रोज बनणारा पदार्थ. भाजी, आमटी, चटणी, कोशिंबीर जे काही असेल ते उजवीकडे, डावीकडे, मध्ये, समोर. पण पोळीची जागा अगदी मध्यभागी. अर्थात, साध्या पोळीला या पदार्थ-उपपदार्थांशिवाय एकट्यानंही संसार करणं शक्य नव्हतं, हीदेखील वस्तुस्थितीच. संध्याकाळी काहीतरी वेगळं हवं, म्हणून एखादा वेगळाच पदार्थ केला जायचा, किंवा बाहेरून काहीतरी मागवलं जायचं किंवा बाहेरच काहीतरी हादडलं जायचं, तेव्हा मात्र घरी एकट्या राहिलेल्या बिचाऱ्या पोळीला ना घरातले लोक विचारत, ना तिच्या जवळचे भाजी-आमटीसारखे सवंगडी. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र शिल्लक राहिलेल्या आदल्या दिवशीच्या पोळीचे तुकडे करून खमंग फोडणीत ते परतले जात, तेव्हा याच पोळीला नाकं मुरडणारेही त्या वासानं स्वयंपाकघराच्या आसपास घोटाळायला लागत. `त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक` अशीच भावना त्यावेळी पोळीच्या मनात असे. फक्त पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहायच्या ऐवजी, ती जिरे-मोहरीच्या फोडणीत बघत असेल, एवढाच काय तो फरक. उरलेल्या पदार्थांपासून तयार होणाऱ्या खमंग पदार्थांमध्ये फोडणीच्या पोळीचं स्थान आघाडीवर असल्यामुळे, तिची दादागिरी इतर पदार्थांना निमूटपणे सहन करावी लागे. कधीकधी मात्र त्यावरूनच वाद होत. मात्र, एके दिवशी फोडणीच्या पोळीची ही मिजास एकदमच खाली आली. स्वयंपाकघराच्या मालकिणीला ब्रेडचा उत्तप्पा या नव्या पदार्थाचा शोध लागला आणि फोडणीच्या पोळीला मग सलग पाच सिनेमे फ्लॉप झालेल्या हिरॉइनसारखी वागणूक मिळू लागली.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- ब्रेडचे पाच-सहा स्लाइस
- तीन टेबलस्पून जाड रवा
- तीन टेबलस्पून तांदूळाची पीठी
- तीन टेबलस्पून मैदा
- अर्धा वाटी दही
- एक चमचा मीठ
- एक छोटा चमचा जिरे
- एक छोटा चमचा काळी मिरी पूड
- एक वाटी बिया काढून बारीक चिरलेले टोमॅटो
- एक गाजर (किसून)
- दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- दोन चमचे किसलेले आले
- अर्धा डाव तेल
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- सुरुवातीला ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून टाकून त्यांचे छोटे तुकडे करून ठेवा.
- मिक्सरच्या मोठ्या भांड्यात ब्रेडचे तुकडे, रवा, तांदूळाची पीठी, मीठ, दही व पाणी घालून वाटून पेस्ट बनवून घ्या.
- एका मोठ्या बाउलमध्ये ही पेस्ट काढून घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून उत्तप्याचे पीठ बनवा.(पीठ फार पातळ अथवा फार घट्ट नसावे)
- त्यात जिरे, बारीक चिरून ठेवलेले टोमॅटो, किसलेले गाजर, किसलेले आले, बारीक चिरून ठेवलेल्या हिरव्या मिरच्या व कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
- गॅसवर मध्यम आचेवर तवा गरम करून घेऊन त्यावर चमच्याने थोडेसे तेल सोडून त्यावर अर्धा कांदा किंवा कच्चा बटाटा तवाभर फिरवून मग हाताने तव्यावर थोडेसे पाणी शिंपडा आणि सुती कपड्याने तवा पुसून घ्या व तव्याला सगळीकडे तेल लावून घ्या.
दोन डाव पीठ तव्यावर घालून सगळीकडे गोल फिरवत पसरून घ्या. - चमच्याने उत्तप्याच्या सगळ्या कडेने तेल सोडा व दोन मिनिटे भाजून घेऊन पलटी करा व दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्या. (आंच मध्यमच ठेवा, मोठी आंच ठेवल्यास उत्तप्पा आतपर्यंत शिजणार नाही व आतून काच्चाच राहील). याच पद्धतीने उर्वरीत उत्ताप्पा बनवा.
- कोणत्याही आवडत्या चटणी सोबत (खोबर्याची चटणी किंवा कोथिंबीरीची हिरवी चटणी) किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरम उत्तप्पा सर्व्ह करा.
[/one_third]
[/row]