[content_full]

“आज कुठल्याही स्थितीत मॅकडीमध्ये जायचं म्हणजे जायचंच!“ मुलं फुरंगटून बसली होती. आज त्यांना कुणाचं काही ऐकून घ्यायचं नव्हतं. `मला वाटतं, कुठल्याही स्थितीत मॅकडीत जाण्यापेक्षा आपण व्यवस्थित, चारचौघांत शोभतील, असे कपडे घालून जाऊया!` बाबांनी विनोद करण्याचा प्रयत्न केला, पण तो नेहमीप्रमाणेच हवेत विरून गेला. त्यामुळे `मॅकडी`, `मकडी` असा काही पंच मारायचा मोह त्यांनी खूप कष्टानं टाळला. आई काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. `तुम्हाला बाहेर खायची चटकच लागली आहे. घरातलं काहीच गोड लागत नाही तुम्हाला. सतत बाहेर खाऊन तब्येतीवर काय परिणाम होतो, किती पैसे जातात, याचा काही विचारच करायचा नाही!` आईनं तोफखानाच डागला. बाबांनीही अधूनमधून तिला दुजोरा देण्याचा प्रयत्न केला. `बाबांनीच फाजील लाड पुरवले आहेत तुमचे!` या वाक्याने आईच्या संतापाची सांगता झाली आणि बाबांवर अचानकच संक्रांत आल्यामुळे पुढे काय बोलावं, हे त्यांना कळेना. घरातल्या या खूप गंभीर वादात मध्यस्थी करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे, असा आत्तापर्यंत त्यांना वाटत होतं. या शेवटच्या वाक्यामुळे त्यांची सॉलिड पंचाईत झाली. काही काळ असाच भयाण शांततेत गेला. यातून काय मार्ग निघणार, याचा काहीच अंदाज येत नव्हता. आई रागावून जी आत निघून गेली, ती बाहेर यायलाच तयार नव्हती. चौघेही चार दिशांना गेले. तासाभराने भूक सहन होईना, तेव्हा पुन्हा बाबा आणि दोन्ही मुलं एकत्र जमले. आईनं बाहेरूनच काहीतरी मागवलं होतं बहुतेक. सगळ्यांनी त्याच्यावर ताव मारला. “बघितलंस? उगाच रागावलीस मुलांवर! बाहेरच्या खाण्याची चव येतच नाही घरच्या पदार्थांना!“ बाबांनी जरा मुलांची बाजू घेतली. आई शांतपणे म्हणाली, `छोले टिक्की म्हणतात ह्याला. आणि हा पदार्थ मी घरीच केलाय!` सगळ्यांचे चेहरे एकाचवेळी उगवले आणि मावळले. कारण आता या औद्धत्याची शिक्षा आपल्याला पुढचा महिनाभर तरी भोगावी लागणार आहे, याची त्यांना कल्पना आली होती!

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • एक वाटी उकडलेले काबुली चणे (छोले)
  • तीन मोठे उकडलेले बटाटे
  • दोन मोठे बारीक चिरलेले कांदेएक चमचा किसलेले आले
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • चवीनुसार मीठ
  • एक चमचा लिंबाचा रस
  • चिमूटभर काळी मिरीची पूड
  • तळणीसाठी गरजेनुसार तेल
  • एक वाटी बारीक शेव
  • चिंचगुळाची आणि पुदिन्याची हिरवी चटणी

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • सुरूवातीला उकडलेले बटाटे सोलून स्मॅश करून ठेवा. तसेच उकडलेले छोलेसुद्धा स्मॅश करून ठेवा.
  • एका मोठ्या बाउलमध्ये स्मॅश केलेले बटाटे व छोले एकत्र घेऊन त्यात किसलेले आले, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,चवीनुसार मीठ, लिंबाचा रस व चिमूटभर काळी मिरीची पूड घालून एकत्र मिक्स करा व तेलाच्या हाताने मळून ठेवा.
  • दहा मिनिटानंतर त्या मळून ठेवलेल्या गोळ्याचे लिंबाएव्हढ्या आकाराचे गोळे करून घ्या व एकेक गोळा तेलाच्या हातावर घेऊन दुसर्‍या हाताने दाबून त्याच्या गोल चपट्या टिक्की बनवा.
  • आता गॅसवर एका फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून घ्या व त्या गरम तेलात या बनवून ठेवलेल्या टिक्की दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून काढा.
  • यानंतर प्लेटमध्ये या तळून तयार झालेल्या ३-४ टिक्की घेऊन त्याच्यावर चिंचगुळाची आंबटगोड चटणी व हिरवी पुदिण्याची चटणी घाला. बारीक चिरलेला कांदा,कोथिंबीर व बारीक शेव घालून सर्व्ह करा.

[/one_third]

[/row]

Story img Loader