[content_full]
“मुलांनो, सांगा बरं, नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष का म्हणतात?“ मारकुटे गुरुजींनी वर्गात प्रश्न केला आणि वर्गात एकदम भयाण शांतता पसरली. कुणी हूं की चूं करेना. “बाळ्या, तू सांग!“ गुरुजींनी मागच्या बाकावर बसलेल्या बाळ्याला सूचना केली आणि बाळ्या नाइलाजानं उठला. “नारळाच्या झाडावर चढल्यानंतरच माझी कल्पू मला पहिल्यांदा दिसली होती, म्हणून नारळाला कल्पवृक्ष म्हणतात!“ असं उत्तर बाळ्यानं दिलं आणि गुरुजींनी बाळ्याच्या पाठीत नारळाच्या झावळांची नक्षी काढली. सगळ्या वर्गानं मग या `महाप्रसादा`चा पोटभर हसून लाभ घेतला. वर्ग संपल्यावरसुद्धा बाळ्याची यथेच्छ टिंगलटवाळी करण्यासाठी सगळ्या वर्गाला हा विषय पुढचा महिनाभर पुरला. अर्थात, जे घडलं त्यात बाळ्याचा फार दोष होता, असं म्हणता येणार नाही. `जे घडलं त्यात`, म्हणजे वर्गात बाळ्यानं जे उत्तर दिलं, त्यात. बाळ्या आणि कल्पूमध्ये जे काही घडलं किंवा घडलं नाही किंवा घडायच्या बेतात होतं, त्यात नव्हे! सांगायचा उद्देश काय, की बाळ्यानं फक्त कल्पवृक्ष या शब्दाचा आपल्या सोयीनं अर्थ लावला. तसं आपणही अनेक शब्दांचे आपल्या सोयीनं अर्थ लावतोच की! आईनं दिलेला तो सल्ला आणि सासूनं केलेली ती ढवळाढवळ असते ना, अगदी तसंच. नारळाचं कसं असतं, फळ तेच, पण सत्काराच्या वेळी श्रीफळ आणि निरोपाच्या वेळी नारळ! श्रीफळ दिल्याचं कौतुक, पण नारळ दिल्याची बातमी मात्र चारचौघांत सांगायची नसते. बाळ्याला या औद्धत्याबद्दल शाळेतून नारळ वगैरे मिळाला नाही, पण गुरुजींना नारळ मात्र आणून द्यायला लागले आणि एकदा तर चक्क नारळाच्या वड्यासुद्धा! याच निमित्तानं आज बघूया नारळाच्या बर्फीची, म्हणजेच नारळाच्या वड्यांची रेसिपी!
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- एक मध्यम नारळ
- पाव लिटर दूध
- पाव किलो साखर|
- अर्धा चमचा वेलची पावडर
- १ लहान चमचा पिस्त्याचे काप
- चारोळी
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- नारळ खोवून घ्यावा.
- खोबरे, साखर व दूध एकत्र शिजत ठेवावे.
- शिजत असतांना सारखे हलवावे.
- गोळा झाल्यावर त्यात वेलचीची पूड घालून एकत्र करावे.
- ताटाला तूप लावून त्यावर गोळा थापावा.
- पिस्त्याचे काप, चारोळी टाकून हलक्या हाताने थापावे.
- गार झाल्यावर वड्या कापाव्यात.
[/one_third]
[/row]