[content_full]
कधीकधी प्रश्न पडतो, की ही सृष्टी नक्की कशी निर्माण झाली असेल? डार्विनच्या उत्क्रांतीवादाला अनुसरूनच ती जन्माला आली असेल का? की त्याच्या सिद्धांतामध्ये काही अर्थ नाही, असे दावे करणाऱ्यांच्या तत्त्वांनुसार तिची निर्मिती झाली असेल? पहिला माणूस कुठे आणि कसा जन्माला आला असेल? एवढी अब्जावधी प्रजा निर्माण करून पृथ्वीचा भार वाढवावा, असं त्याला का वाटलं असेल? एवढी प्रजा खरंच एका माणसापासून निर्माण झाली असेल का? किंवा जो कुणी जगन्नियंता, पृथ्वीचा उद्गाता वगैरे आहे, त्यानं प्रत्येक माणसाला वेगळे चेहरे, वेगळे स्वभाव देण्यासाठी कुठलं सॉफ्टवेअर वापरलं असेल? त्यासाठी animation, स्पेशल इफेक्टसचा आधार घेतला असेल का? ते कुठून डाउनलोड केलं असेल? डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा तेजस्वी, अतिहुशार प्राणी जन्माला घालण्यासाठी त्यानं जगातल्या सगळ्या बुद्धिजीवींच्या मेंदूमधल्या हार्ड डिस्क एकत्र केल्या असतील का? पहिल्या माणसाला बोलायला कसं जमलं असेल? त्यानं शब्द कसे बनवले असतील? बोलण्यासाठी भाषेचा विकास त्यानं कसा केला असेल? आणि लग्न झाल्यानंतर जिच्याशी कधी संबंधच येणार नाहीये, अशी बोलभाषा निर्माण तरी कशाला केली असेल? एवढ्या वेगवेगळ्या प्रांतांमधल्या, हजारो भाषा, लाखो शब्द कसे निर्माण केले असतील? ते करण्यामागे नेमकी कोणती प्रेरणा असेल? एवढे सण, समारंभ, प्रथा, रूढी, परंपरा कशा निर्माण झाल्या असतील? त्यासुद्धा उत्क्रांत झाल्या असतील का? एकेकाळी पृथ्वीवर राज्य करणारे सगळे डायनोसॉर एका रात्रीत (किंवा दिवसात) नाहीसे झाले असतील का? तेव्हा अख्खी पृथ्वीच उद्ध्वस्त झाली असेल का? तशी वेळ पुन्हा येणार आहे का? खरंच ती वेळ जवळ आली आहे का? अन्न शिजवून खाणं माणसाला कसं कळलं असेल? तेलाची, तुपाची फोडणी, चटण्या, कोशिंबिरी, उकडलेल्या, शिजवलेल्या भाज्या, रस्से, पाक, कढ्या, आमट्या, वरणं, माणूस कुठून आणि कशी शिकला असेल? या प्रश्नांची उत्तरं सापडतील तेव्हा सापडोत. जगाचा अंत कधी व्हायचा असेल तेव्हा होवो. आपण त्याच्या आधी मक्याचे कटलेटस शिकूया. चला!
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- दोन वाट्या मक्याच्या कोवळ्या कणसाचे (स्वीटकॉर्न) दाणे
- दोन मध्यम आकाराचे बटाटे
- दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट
- दोन चमचे कॉर्नफ्लोअर
- चवीनुसार लिंबाचा रस
- ब्रेडक्रम्स
- मीठ व साखर
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- प्रथम बटाटे व मक्याचा कोवळ्या कणसाचे दाणे उकडून घ्या.
- उकडलेले बटाटे कुस्करा.
- त्यात मक्याचे दाणे, आलं-लसूण-मिरची पेस्ट, मीठ, साखर, चवीनुसार लिंबाचा रस, मीठ, ब्रेडक्रम्स, कॉर्नफ्लोअर घालून मळून घेऊन गोळा करा.
- तेलाच्या हातावर वड्यासारखे थापून आणि तेलात तळा किंवा तव्यावर तेल सोडून परता आणि चटणीबरोबर सर्व्ह करा.
[/one_third]
[/row]