आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे खास करुन महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये जेवणात तोंडी लावणे हा महत्त्वाचा प्रकार. आपल्याकडे ताट वाढताना उजव्या बाजूला जितके महत्त्व असते तितकेच किंबहुना त्याहून थोडे जास्तच डाव्या बाजूला असते. वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, चटणी, लोणचं, पापड, भजी असं काही ना काही या बाजूला असतंच. महाराष्ट्रात साधारणपणे नेहमीच्या जेवणात आपण दाण्याची, लसणाची, तिळाची, खोबऱ्याची, जवसाची, मिरचीचा खर्डा असे चटण्यांचे वेगवेगळे प्रकार करतो. आज आपण करुयात वर्षभर टिकणारी दही मिरची रेसिपी.
झणझणीत दही मिरची साहित्य
२५० ग्राम लांब जाडी मिरची
१ कप दही
१/२ टेबलस्पून तेल
१ टीस्पून हळदी
१ टीस्पून मोहरी, जीरे
१/४ टीस्पून हिंग
१ टिस्पून साखर
- झणझणीत दही मिरची कृती
- सगळ्यात आधी मिरच्या स्वच्छ धुूवून व्यवस्थित कोरड्या करून घ्या. यानंतर मिरच्यांवर उभा काप द्या.
- यानंतर एका भांड्यात दही घ्या. त्यामध्ये मीठ, हिंग, हळद, धने- जिरे पूड, दाण्याचा कूट असं सगळं टाका आणि दही चांगलं फेटून घ्या.
- त्यानंतर दह्यामध्ये मिरच्या टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या. दही सगळ्या मिरच्यांना सारखं लागेल असं पाहा. यानंतर या भांड्यावर झाकण ठेवा आणि रात्रभर मिरच्या दह्यामध्ये मुरू द्या.
- यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी एका ताटात प्लॅस्टिक पसरवा आणि त्यावर या मिरच्या उन्हात वाळत घालायला ठेवा. मिरच्या पुर्णपणे वाळल्या की त्या डब्यात भरून ठेवू शकता.
- जेव्हा खायच्या असतील तेव्हा जेवढ्या पाहिजे तेवढ्या मिरच्या घ्या आणि त्या तेलात तळून काढा. जेवणात तोंडी लावायला खूप छान लागतात.