[content_full]
यंदाच्या दिवाळीत हरभरा डाळीने भरपूर भाव खाल्ला. शेतकऱ्यांना कधी नव्हे ते जादा पैसे मिळाले, सामान्यांना डाळीच्या दरात भरडून निघावं लागलं, विरोधकांना नवा मुद्दा मिळाला, सरकारला नवी आश्वासनं मिळाली, व्यापाऱ्यांना त्यांचं नेहमीचं कमिशन मिळालं. स्वस्तातली सरकारी डाळ किती जणांना आणि कुठे कुठे उपलब्ध झाली, हा चर्चेचा आणि वादाचा मुद्दा असू शकतो. आपण त्यात पडायची गरज नाही. कारण आपला संबंध वेगळ्या `खाण्या`शी आहे. तर सांगायचा मुद्दा काय, की दिवाळीतल्या फराळातले मुख्य पदार्थ बेसन लाडू, शेव यांचं हरभरा डाळीशिवाय पान हलत नाही. त्यातल्या त्यात चकल्या, कडबोळी बिचारी समंजस. हरभरा डाळ असली तरी चालते, नसली तरी चालते, अशी त्यांची मध्यमवर्गीय वृत्ती. हरभरा डाळीला मात्र आपल्यावाचून तुमचा फराळ होत नाही, असं मिरवून घ्यायची भरपूर संधी. आणि तशीही ती रोज वडापाव, भजी, यांच्यामध्ये मिरवून घेत असतेच. तरीही, तिला गर्व वगैरे नाही बरं का! बिचारी, एकटी तर एकटी सगळं काम निभावते, कधीकधी तिच्या जावा, नणंदा, सासवांबरोबरही नीट जमवून घेते. `घेणार असाल तर मला एकट्याला घ्या, त्यांना घेतलंत तर मी पुन्हा तोंड दाखवणार नाही,` असला माज करत नाही. म्हणून तर इतर डाळी, कडधान्यं यांच्याबरोबर तिचं जमतं आणि खमंग भाजणी साकारते. डाळ भाजून जशी खमंग भाजणी होते, तशीच ती भिजत घालूनही छान खुसखुशीत वडे होऊ शकतात. हरभरा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ यांना एकत्र करून छान वडे करता येतात. रोजच्या फराळाला कंटाळला असाल, तर घरच्या घरी विरंगुळा आणि वेगळी चव म्हणून हा प्रयोग करायला हरकत नाही. मराठवाड्यात लोकप्रिय असलेला हा पदार्थ करायलाही अगदी सोपा आणि सुटसुटीत.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- २ वाट्या चण्याची डाळ
- १ वाटी मुगाची डाळ
- १/२ वाटी उडदाची डाळ
- मुठभर तांदूळ
- २ चमचे धने-जीरे पूड
- ३-४ हिरव्या मिरचीचे वाटण
- १/२ चमचा हळद
- १ वाटी ओली मटकी
- कढीपत्ता
- तळण्यासाठी तेल
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- प्रथम सर्व डाळी धुवून वेगवेगळ्या भिजत घालाव्यात.
- तांदूळ भिजत घालावे.
- २ ते ३ तासाने चांगल्या भिजल्यावर सर्व डाळी आणि तांदूळ जाडसर वाटून घ्यावेत.
- त्यात बारीक केलेली मिरची, धने जिऱ्याची पूड, कढीपत्ता बारीक चिरून, चवीनुसार मीठ आणि ओली मटकी (न वाटता) घालावी.
- पाऊण वाटी तेल कडकडीत गरम करून त्याचे मोहन वरील मिश्रणात घालावे. आणि ते एकजीव करून घ्यावे.
- या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे थापून चपटे वडे करून घ्यावेत.
- उकळत्या तेलात हे वडे खरपूस तळून घ्यावेत. सास किंवा हिरव्या चटणी बरोबर खायला द्यावे.
[/one_third]
[/row]