[content_full]

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळपासून बटाटा फुरंगटून बसला होता. कुणाशीच बोलायला तयार नव्हता. निर्मलाताईंनाही त्याच्याकडे बघायला वेळ नव्हता. सकाळचा चहा, नाश्ता, मुलांचे डबे वगैरे झाल्यानंतर त्या थोड्याशा मोकळ्या झाल्या, तेव्हा फुरंगटून एका कोपऱ्यात बसलेल्या बटाट्याकडे त्यांचं लक्ष गेलं. “काय झालं माझ्या राजाला?“ त्यांनी आस्थेनं चौकशी केली. तरीही बटाटा काही बोलायला तयार नव्हता. निर्मलाताईंनी लाडीगोडी लावून पाहिली, त्याच्या आवडीच्या गोष्टी बोलून बघितल्या, तरी बटाटा ऐकायला तयार नव्हता. त्याचं काहीतरी बिनसलं होतं, हे खरंच. बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यानंतर शेवटी बटाटा कसंबसं मुसमुसून बोलायला लागला. “मला तुम्ही काही किंमतच देत नाही. कायम दुय्यमच वागणूक मिळते मला!“ निर्मलाताईंना हे शब्द ऐकून धक्काच बसला. “असं का रे म्हणतोस? तुझी भाजी करतो आम्ही, उपासाच्या दिवशी तर तुझ्याशिवाय करमत नाही आम्हाला!“ त्यांनी बटाट्याची समजूत काढली. “हो, भाजी करता, पण `रोज काय बटाट्याची भाजी?` असे टोमणे ऐकून घ्यावे लागतात. एखादा असतो तब्येतीनं जरा अघळपघळ. पण म्हणून तुमची पोटं सुटायला, जाडी वाढायला मीच एकमेव कारण असल्यासारखं टोचून बोललं जातं मला. माझे पराठे आवडतात सगळ्यांना, पण ते अगदीच आयत्यावेळचं आणि सोपं खाणं म्हणून हिणवलं जातं. दरवेळी मला चेचून, कापून, ठेचून, रगडूनच कुठे कुठे कोंबलं जातं नाहीतर वाटलं, भरडलं जातं. माझी म्हणून काही आयडेंटिटीच राहिली नाहीये!“ बटाटा आणखीनच मुसमुसला. अच्छा, म्हणजे हा प्रश्न आयडेंटिटी क्रायसिसचा होता तर! बटाट्याला स्वतःची ओळख हवी होती. निर्मलाताईंना आता सगळा प्रकार लक्षात आला. मग त्यांनी परिस्थिती जरा नाजूकपणे हाताळायचं ठरवलं. “बरं, आज तुला न कापता, न चिरता, न ठेचता, तुझी एक अशी भाजी बनवते की सगळे तुझं रूप नुसतं बघत राहतील!“ निर्मलाताईंनी त्याला प्रॉमिस केलं आणि `दम आलू` बनवायला घेतले.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • छोट्या आकाराचे बटाटे अर्धा किलो
  • तिखट, हळद, 2 लवंग, दालचिनीचा अर्ध्या इंचाचा तुकडा, वेलदोडा
  • दोन कांदे
  • आवडीनुसार आलं-लसूण पेस्ट
  • १ टोमॅटो
  • मूठभर काजू
  • अर्धी वाटी दही
  • कसुरी मेथी चिमूटभर
  • तेल, मीठ

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • बटाटे थोडं मीठ घालून उकडून घ्यावेत
  • सालं काढून त्याला टोचे मारावेत
  • दोन चमचे तेलात अर्धा चमचा तिखट आणि चिमूटभर हळद घालावी थोडं परतल्यावर उकडलेले बटाटे घालून चांगले परतून बाजूला काढून ठेवावे.
  • त्याच तेलात लवंग, दालचिनीचा तुकडा, वेलदोडा घालून परतावे
  • उभा चिरलेला कांदा-आलं लसूण पेस्ट, बारिक चिरलेला टोमॅटो आणि मूठभर काजू घालून परतावा.
  • बाजूने तेल सुटू लागल्यावर मिश्रण गार होण्यास ठेवून द्यावे.
  • गार झाल्यावर ते मिश्रण मिक्सर मधून काढावे.
  • एक चमचा तेल गरम करून तेल जिरं घालणे, बारीक केलेली पेस्ट घालावी.
  • अर्धी वाटी दही आणि पाणी घालून 2 मिनिटे उकळावे.
  • उकडलेले बटाटे घालून दहा मिनिटे शिजवावेत.
  • आवडीनुसार कसुरी मेथी वरून घालावी.

[/one_third]

[/row]

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make dum aloo