पुलाव, मसाले भात, चाट यांसारख्या पदार्थांमध्ये हिरव्या मटारांचा वापर अगदी हमखास केला जातो. मात्र, तुम्हाला कधी भाजी बनवण्याचा कंटाळा आला असेल तर हिरव्या मटारची उसळ हा खूपच सोपा आणि स्वादिष्ट पर्याय आहे. पण, तुम्ही वाटण घालून बनवलेली मटारची उसळ खाऊन पाहिली आहे का?
अशी वाटण घालून मटार उसळ कशी बनवायची याची अत्यंत साधी आणि सोपी रेसिपी इन्स्टाग्रामवरील iambhagyashrii नावाच्या अकाउंटने तिच्या पेजवरून शेअर केली आहे. काय आहे मटारच्या उसळीची रेसिपी पाहा, लिहून घ्या आणि बनवून पाहा.
वाटण घालून केलेली मटारची उसळ :
साहित्य
२ वाट्या – मटारचे दाणे
अर्धी वाटी – ओलं खोबरं
कांदा
टोमॅटो
३/४ – लसणीच्या पाकळ्या
३ – काजू
कोथिंबीर
हिंग
हळद
गरम मसाला
सब्जी मसाला
मीठ
तेल
हेही वाचा : Recipe : दोडक्याच्या सालींचा ‘असा’ करा वापर; बनवून पाहा ‘हा’ झणझणीत पदार्थ…
कृती
उसळीसाठी वाटण :
- सर्वप्रथम एक कांदा स्वच्छ धुवून त्याचे मोठे तुकडे चिरून घ्या.
- टोमॅटो धुवून त्याच्या मोठ्या फोडी करून घ्या.
- आता चिरलेला कांदा आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात घाला. तसेच त्यामध्ये ३ ते ४ लसूण पाकळ्या, ओले खोबरे, काजू असे घालून घ्या.
- सर्व पदार्थ वाटून घ्यावे. आता त्यामध्ये कोथिंबीर घालून पुन्हा वाटण छान बारीक वाटून घ्या.
- आपले उसळीसाठी तयार झालेले वाटण एका बाऊलमध्ये काढून घ्या.
उसळ कशी बनवावी
- एका कढईमध्ये तेल तापवत ठेवावे.
- तेल तापल्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद आणि मध्यम-बारीक चिरलेला कांदा घालून घ्या.
- सर्व गोष्टी छान परतून घ्या. कांद्याचा रंग गुलाबी होईपर्यंत तो छान शिजवून घ्यावा.
- आता यामध्ये तयार केलेले वाटण घालून घ्या.
- या वाटणाला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. वाटण कमी परतले किंवा कच्चे राहिले तर उसळीची चव बिघडू शकते.
- वाटण मस्त परतल्यानंतर त्यामध्ये चमचाभर लाल तिखट, गरम मसाला आणि सब्जी मसाला घालावा. मसाले घालून झाल्यावर पुन्हा सर्व मिश्रण दोन मिनिटांसाठी परतून घ्या.
- आता यामध्ये मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून तयार होणारी ग्रेव्ही चांगली उकळून घ्या.
- ग्रेव्ही उकळली की त्यामध्ये ब्लांच केलेले मटार सोडून द्या. ब्लांच म्हणजे, मटार काही मिनिटे गरम पाण्यात उकळून घ्यायचे आहेत.
- मटार घातल्यानंतर उसळ ढवळून घ्या. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- तयार आहे आपली वाटण घालून बनवलेली मटारची उसळ.
- ही उसळ तुम्ही पोळी, भात यांसह खाऊ शकता.
हेही वाचा : Recipe : कैरीच्या आंबट-गोड गोळ्या कशा बनवायच्या? अचूक प्रमाणासह पाहा ही रेसिपी
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @iambhagyashrii या अकाउंटने ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी शेअर केली आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ९५.७K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.