आंब्याचा मौसम आलेला आहे. बाजारात सगळीकडे आंबे आणि त्याचे विविध प्रकार दिसू लागले आहेत. अनेकांनी या वर्षीचा पहिला आंबा चाखलादेखील असेल. कोकणातून कुणी तुमच्यासाठी खास हापूस आंबे पाठवणार असतील तर यंदा केवळ आमरसावर थांबू नका. त्याच्याऐवजी आंब्याची कढी हा भन्नाट गुजराती पदार्थ बनवून पाहा.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून natashaagandhi नावाच्या अकाउंटवरून या आंब्याच्या कढीची रेसिपी शेअर झाली आहे. याला आंब्याची कढी किंवा ‘फजेतो’ [Fajeto] असेही म्हणतात. चला तर मग या पदार्थाचे साहित्य, कृती आणि रेसिपी पाहू.
हेही वाचा : Recipe : पोटाला अन् मनाला अराम देणारे ‘चौरंगी ताक’! पाहा कसे बनवायचे हे ‘चार’ फ्लेव्हर…
गुजराती पद्धतीने बनवा आंब्याची कढी :
साहित्य
हापूस आंबे
१ ते दीड कप दही
२ चमचे बेसन
३ चमचे तूप
१ चमचा जिरे
१ चमचे मोहरी
४-५ लवंग
२ दालचिनी
अर्धा चमचा हिंग
कढीपत्ता
१ चमचा आले-मिरची पेस्ट
२-३ लाल मिरच्या [कोरड्या]
२ चमचे हळद
२ कप पाणी
मीठ
कृती
- सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुवून घ्या आणि आमरस करतो तसे सर्व आंबे एका पातेल्यात पिळून घ्या.
- आता त्या आंब्याच्या रसात, फेटलेले दही आणि बेसन घालून घ्यावे. सर्व गोष्टी छान ढवळून एकजीव करून घ्यावे.
- एक पातेले गॅसवर ठेवून त्यामध्ये तूप तापवून घ्या.
- तूप तापल्यावर त्यामध्ये जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी, हिंग घालून घ्या. तसेच या फोडणीत कढीपत्ता, कोरड्या लाल मिरच्या, आले आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून सर्व पदार्थ छान परतून घ्यावे.
- सर्व पदार्थ खमंग परतून झाल्यावर आंबा आणि दह्याचे तयार केलेले मिश्रण घालून नीट ढवळून घ्या.
- आता यामध्ये दोन कप पाणी घालून तयार होणारी कढी ढवळत रहावी. सर्व पदार्थांची चव तयार होणाऱ्या आंब्याच्या कढीमध्ये मुरल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
- आपली हापूस आंबा कढी तयार आहे.
- तयार झालेल्या आंब्याच्या कढीचा आस्वाद गरमागरम पोळी किंवा फुलक्यासह घ्यावा.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडीओला ९०२K इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्हाला ही भन्नाट आणि जरा हटके अशी ही फजेतो रेसिपी आवडली असेल तर नक्कीच बनवून पाहू शकता.