[content_full]

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आटपाट नगर होतं. तिथे एक श्रीमंत माणूस राहत होता. घर संपन्न होतं, माणूस सुखी होता. एक बायको, दोन मुलं असा चौकोनी परिवार होता. अशा सुखी घरात राहत असलेल्या त्या माणसाच्या बायकोला मात्र एक खंत होती. आपल्याएवढंच सुखी, समृद्ध असलेलं आपल्या भावाचं घर तिनं मुलांना कधी दाखवलं नव्हतं. मुलांना घेऊन मामाच्या गावाला जाणं तिला कधी जमलंच नव्हतं. एका रविवारी तिनं बेत केला. गाडी काढून बाई मुलांना घेऊन माहेरी गेली. माहेरी जंगी स्वागत झालं. भावाला प्रचंड आनंद झाला. त्यानं बहिणीच्या स्वागताचा थाट उडवून दिला. तिच्यासाठी पंचपक्वान्नं शिजली. स्वतः भाऊ आपल्या बहिणीला आणि भाचरंडांना जेवण वाढण्यासाठी पुढे झाला. पण मुलांना जेवण आवडेना. ही भाजी कसली? बाळा, ही उसळ. हिरव्या मुगाची. ही चटणी कसली? ही चटणी पुदिन्याची. सगळं आपल्याच शेतातलं बरं. आईही रागावली. मुलांना दटावली. मुलं काही ऐकेनात. पानात वाढलेलं जेवेनात. आईनं मग युक्ती केली. जेवणाची पंगत थोडी पुढे ढकलली. भावाला म्हणाली, दादा तू उदास होऊ नकोस. घेतला वसा टाकू नकोस. मुलं हेच अन्न जेवतील, अगदी मिटक्या मारत. भाऊ चमकला. त्याला काहीच अंदाज नव्हता. बहिणीने मग पदर खोचला. सगळं साहित्य घेऊन ती स्वयंपाकघरात गेली. मूग, पुदिना, पालक, बटाटे, सगळं तेच साहित्य वापरून तिनं `ग्रीन कबाब` बनवले. मुलांच्या ताटात वाढले. मुलांनी मिटक्या मारत खाल्ले. मुलांनो, आज एवढे लाड झाले. पण तुम्ही मघाशी जे नाकारले, तेच आत्ता खाल्ले. तेव्हा यापुढे उतू नका, मातू नका. अन्नाला नावं ठेवू नका. मुलं वरमली. मामाची माफी मागितली आणि सगळंच अन्न पोटभर जेवूनच पानावरून उठली. अशी ही हराभरा कबाबची हरीभरी कहाणी घरोघरी सुफळ संपूर्ण.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • भिजवलेले हिरवे मूग 2 वाट्या
  • पुदीना पाने पाव वाटी
  • पालक 10 ते 15 पाने
  • दोन बटाटे
  • कॉर्नफ्लोअर 1 टेबलस्पून
  • आल्याचा दीड इंचाचा तुकडा
  • कच्चा मसाला अर्धा टी-स्पून
  • अर्धे लिंबू
  • लसूण 5 ते 6 पाकळ्या
  • हिरव्या मिरच्या 5 ते 6
  • बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
  • ब्रेड चुरा 1 वाटी
  • तेल पाव वाटी
  • चवीनुसार मीठ

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • मूग, पुदीना, पालक सर्व उकडून घ्यावे. त्यात उकडलेला बटाटा किसून घालावा, आले, लसूण, मिरची वाटून घ्यावी, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
  • वरिल सर्व जिन्नस एकत्र करून त्यात मसाला, मीठ कॉर्नफ्लोअर घालावे. हे मिश्रण घट्ट मळून घेणे. त्यास हवा तसा आकार देऊन ब्रेडचुऱ्यात घोळवून तव्यावर शॅलोफ्राय करावे.
  • सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर खावेत.

[/one_third]

[/row]

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make hara bhara kabab green kabab