वडापाव, सामोसा, डोसा, इडली, भजी आदी अनेक चटपटीत पदार्थांची चव वाढवणारा एकमेव पदार्थ म्हणजे चटणी. चटणी शिवाय या पदार्थांची चव अपुरी आहे असे म्हणायला हरकत नाही. तसेच जेवणाची चव वाढवण्यासाठी लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, पुदिन्याच्या चटणी व कोथिंबिरीची चटणी आवर्जून खाल्ली जाते. तर आज आपण कोथिंबिरीची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत ; जी तुम्ही डोसा किंवा भजी बरोबर आवर्जून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊ या रेसिपी.
साहित्य –
- एक कोथिंबिरीची जुडी
- पुदिना
- एक कांदा
- तीन ते चार लसूण पाकळ्या
- तीन हिरव्या मिरच्या
- आलं
- मोहरीचे तेल
- शेंगदाणे
- मीठ
कृती –
- कोथिंबीर व पुदिना निवडून त्यांना स्वछ धुवून घ्या.
- कांदा, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.
- शेंगदाणे भाजून सोलून घ्या.
- सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- अशाप्रकारे तुमची ‘कोथिंबिरीची चटणी’ तयार.
- तुम्हीही चटणी कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ शकता.
कोथिंबीर रोजच्या आहारातील एक महत्वाचा घटक आहे. अगदी मसालेदार भाजी ते चमचमीत पदार्थांच्या सजावटीसाठी कोथिंबीर अगदीच फायदेशीर ठरते. तसेच कोथिंबीर खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. रोजच्या जेवणामध्ये ताज्या कोथिंबीरीची चटणी १-२ चमचे खाल्ली असता अपचन, आम्लपित्त, अन्नावरील वासना कमी होणे, पोटात गुब्बारा धरणे, अल्सर, मूळव्याध आदी विकार होत नाहीत.रोज सकाळी कोथिंबीर पाने १०-१२ व पुदिना पाने ७-८ पाण्यातून उकळून घेतल्यास शरीरातील विषारी घटक शौच व लघवीद्वारे बाहेर पडतात. तसेच शरीरातील वाईट कोलेस्ट्रेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी होण्यास मदत होते.