[content_full]

डोसा खाण्यापेक्षा तो तयार होण्याचा, त्याचा मनमोहक आकार आणि रचना बघण्याची जी मजा आहे, ती अन्य कशात नाही. आपण छानपैकी कुठल्याही हॉटेलात जाऊन बसतो. प्रत्येकाच्या आवडीचा डोसा मागवतो. कुणाला साधा डोसा हवा असतो, कुणाला मसाला, कुणाला रवामसाला, कुणाला पेपर डोसा, कुणाला म्हैसूर मसाला. मध्येच कुणीतरी उत्तप्पा मागवतं. शक्यतो आपली डिश वेगळी असायला हवी, हा आग्रह प्रत्येकाचा असतो. नंतर हॉटेलच्या भटारखान्याच्या दिशेने आपले कान आणि डोळे लागतात. तिथून तव्यावर उलथणं आपटल्याचे, डोसा कट केल्याचे, तेल टाकल्याचे आवाज यायला लागतात, डोसा भाजला गेल्याचा खमंग वास येऊ लागतो, तो अनुभवण्यात वेगळाच आनंद असतो. भलामोठा पेपर डोसा त्रिकोणी आकारात किंवा गुंडाळलेल्या स्वरूपात आपल्यासमोर आला, की अक्षरशः डोळे दिपून जातात. मसाला डोसा व्यवस्थित गुंडाळून, डिशमध्ये बॅलन्स करून त्याच्या आत भाजी कशी भरली असेल, असा प्रश्न पहिल्या पहिल्यांदा तर हमखास पडतोच! भाजीच्या वरच्या डोशाच्या भागाचे तुकडे करून, त्यातून ती भाजी खाण्याची कला ज्याली जमली, तो खरा मसाला डोसाप्रेमी! गाडीपाशी उभं राहून डोसा खाण्याची मजा आणखी वेगळी. तिथे तर तव्यावर पाणी टाकल्यानंतर येणाऱ्या चर्रर्र आवाजापासून ते त्याचा घास जिभेवर पडेपर्यंत सगळी प्रक्रिया अगदी मनसोक्त अनुभवता येते. कट डोसा किंवा लोणी स्पंज डोसा करताना तिथल्या कर्मचाऱ्याचं हस्तलालित्य पाहण्यासारखं असतं. आज वेगळ्या डोशाची रेसिपी देतोय, म्हणून एवढं सगळं डोसापुराण! तर, यावेळी बाहेर डोसा खाण्यापेक्षा घरीच हा वेगळा पदार्थ करून बघा आणि त्याची मजा घ्या!

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य

  • शिजवलेला भात 2 वाट्या
  • कणीक 1 वाटी
  • तांदूळ पिठी 1 वाटी
  • दही अर्धी वाटी
  • मीठ
  • सोडा पाव चमचा.

[/two_thirds]

[one_third]

पाककृती

  • शिजवलेला भात, कणीक आणि तांदूळ पिठी मिक्सरमध्ये (पाणी घालून) बारीक करून घ्यावी.
  • पिठात दही, मीठ, सोडा घालावा. हे मिश्रण एकजीव झालं, की नेहमीच्या डोशासारखं गरमागरम तव्यावर ते झकासपैकी पसरून आपल्या नेहमीच्या डोशासारखे डोसे करावेत आणि मनसोक्त खावेत.

[/one_third]

[/row]

Story img Loader