वर्षातून एकदा केली जाणारी ‘सिझनल’ भाजी म्हणजे फणसाची भाजी. कोकणात तर उन्हाळा सुरू झाला की, हा पदार्थ हमखास बनवला जातो. मात्र, फणसाची भाजी करणे अजिबात सोपे नसते, असे अनेकांचे मत असते. त्याला कारण म्हणजे भाजीसाठी चिरावा लागणारा फणस. फणस चिरण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. फणस चिरण्याआधी सुरी आणि हाताला तेल लावायचे. मग हाताला फणसाचा चीक लागू न देता, तो चिरायचा. अशी सर्वसाधारण फणस चिरण्याची कटकट वाटणारी पद्धत असते.

मात्र,आज कुकरचा वापर करून आणि तेल अजिबात न वापरता, फणस कसा चिरायचा त्याची अफलातून ट्रिक पाहा. त्याचबरोबर चिरलेल्या फणसाची भाजी कशी करायची हेदेखील शिकू या. फणस चिरायची ट्रिक आणि रेसिपी यूट्युबवरील vmiskhadyayatra103 नावाच्या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आली आहे.

हेही वाचा : Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ

फणसाची भाजी रेसिपी

फणस कसा चिरावा?

सर्वप्रथम छोट्या आकाराचा फणस तेल न लावता, विळीवर मधोमध चिरून घ्यावी.
आता त्याच पद्धतीने विळीवर अर्ध्या केलेल्या फणसाचे अजून दोन लहान भाग चिरून घ्या.
फणसाचे चिरलेले तुकडे कुकरच्या एका भांड्यामध्ये ठेवा. फणस मऊ होण्यासाठी कुकरच्या भांड्यात थोडेसे पाणी घालावे.
आता फणसाचे हे तुकडे कुकरला लावून, त्याच्या साधारण तीन ते चार शिट्या करून, फणस उकडून घ्यावा.
कुकरच्या शिट्या झाल्यावर फणस थोडा कोमट होईपर्यंत वाट पाहावी.
उकडलेल्या फणसाची साले विळीवर अतिशय सहज चिरून काढून, भाजीसाठी दोन तुकडे केलेल्या फणसाचे आणखी बारीक बारीक तुकडे करावेत.
अशा पद्धतीने तेल न लावता आणि हात अजिबात चिकट न होऊ देता, फणस चिरून घ्यावा.
आता फणसाच्या भाजीची रेसिपी पाहू.

भाजी रेसिपी –

साहित्य

तेल
उकडलेले हरभरे / काळे चणे
लाल कोरड्या मिरच्या
ओले खोबरे
गूळ
मोहरी
जिरे
हळद
लाल तिखट
हिंग
मीठ

हेही वाचा : Recipe : हॉटेलपेक्षा भारी दहीवडा घरच्याघरी बनवा! काय आहे साहित्य अन् रेसिपी, पाहा…

कृती

  • सर्वप्रथम एका कढईमध्ये दोन मोठे डाव तेल तापवून घ्या.
  • त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी, जिरे, हळद, हिंग व लाल तिखट टाकून सर्व पदार्थ चांगले तडतडू द्यावेत.
  • आता फोडणीमध्ये चार ते पाच लाल मिरच्या व उकडलेले हरभरे घालून परतून घ्या आणि त्यात चिरून घेतलेल्या फणसाच्या फोडी घाला.
  • कढईतील सर्व पदार्थ चांगले ढवळून घेतल्यावर भाजीमध्ये मीठ, ओले खोबरे आणि थोडेसे पाणी घाला. तसेच वरून गूळ घालून भाजी शिजवून घ्यावी.
  • तयार झालेली फणसाची भाजी एका बाऊलमध्ये काढून घेऊन, त्यावर पुन्हा थोडे ओले खोबरे घालावे.

टीप : फणसाची भाजी करताना तेल अधिक प्रमाणात लागते. तसेच गूळ आणि ओले खोबरेदेखील सढळ हाताने घातल्यास भाजीला चांगली चव येते.

यूट्युबवरील @vmiskhadyayatra103 या अकाउंटद्वारे फणसाच्या भाजीची ही भन्नाट रेसिपी आणि फणस चिरायची सोपी ट्रिक दाखविण्यात आली आहे.

Story img Loader