[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोजच्याच जेवणात काहीतरी वेगळं खायची इच्छा निर्माण झाली असेल, तर कढी पकोडा हा एक मस्त पर्याय आहे. मुळात दूध, दही, ताक, तूप, लोणी, अशा दुग्धजन्य पदार्थांशी आपलं जिव्हाळ्याचं नातं आहे. रोजच्या वरण, आमटीचा कंटाळा आला की आपण कढी करतोच. किंवा ताक उरलं असेल, तरी करून `आज काहीतरी वेगळं केल्या`चा फील आणतो. रोजच्या साध्या भाताचा कंटाळा आला तर आपण त्याला जिऱ्याची किंवा कांद्याची फोडणी घालतो किंवा अगदीच उत्साह असला, तर डाळ घालून खिचडी किंवा कांदा, भाज्या घालून मसालेभातसदृश काहीतरी करतो ना, अगदी तसंच! कढीसुद्धा अशीच रोजच्या जेवणाला एक मस्त चव आणते. हिंग मिरचीची फोडणी असेल, तर त्याची लज्जत आणखी वाढते. कढीचे वेगवेगळे प्रकार मस्त होतात. हिंग, ओवा, मिरची यांच्या प्रमाणानुसार आणि वापरानुसार त्यांची चव बदलते. हिरवी मिरची फोडणीत घालून केलेली कढी आणि लाल मिरचीची वरून फोडणी देऊन केलेली कढी, यांची चवही वेगळी असते. कढी पकोडा हा गुजरात, राजस्थानमध्ये लोकप्रिय असलेला पदार्थ आता मराठी लोकांनाही आवडीचा झाला आहे. भजी हा मराठी माणसाचा आवडता प्रकार. व्हेज मंचुरियनमध्ये जशी ग्रेव्ही आणि मंचुरियन यांची सांगड घातल्यावर भन्नाट चव येते ना, तसंच इथे कढीत भजी घातल्यावर मजा येते. कढी करताना तिच्या दाटपणावर चवीत बदल होत असतो. जास्त पातळ कढीही चांगली लागत नाही आणि जास्त दाट झाली, की तिचं पिठलं होतं. पकोडे किंवा भजी या कढीत घातल्यानंतर काही वेळ तसंच हे मिश्रण गरम होऊ दिलं, तर त्याला एक झकास चव येते आणि ते एकजीव होतं. कढीत मुरलेले हे पकोडे मग खायलाही मस्त लागतात.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • २ कप बेसन
  • ६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • १ लहान चमचा लाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • २ मोठे चमचे तेल
  • पकोडे तळण्यासाठी वेगळं तेल
  • कढीसाठी साहित्य
  • ५ कप आंबट दही
  • ६ मोठे चमचे बेसन
  • १ लहान चमचा मोहरी
  • १/२ लहान चमचा हळदपूड
  • ६ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • १ इंच बारीक चिरलेला आल्याचा तुकडा
  • चिमूटभर हिंग
  • ४ कप गरम पाणी
  • मीठ चवीनुसार
  • वरून फोडणीसाठी
  • १ लहान चमचा तेल
  • २ अख्ख्या लाल मिरच्या

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • कढी बनवण्यासाठी दह्यामध्ये बेसन व पाणी घालून हॅण्ड मिक्सरने एकजीव करुन घ्या.
  • एका मोठ्या पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंगाची फोडणी घाला. मग त्यामध्ये आलं, हिरव्या मिरच्या आणि हळद घाला.
  • त्यानंतर दही-बेसनाचं मिश्रण आणि मीठ घाला. मोठ्या आचेवर मिश्रण उकळा. मग आच कमी करा. जवळपास १५ मिनिटं मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • आता पकोड्यांसाठी बेसनमध्ये पाणी घालून घट्ट भजीसारखं पीठ तयार करा आणि ते व्यवस्थित फेटा.
  • यामध्ये हिरव्या मिरच्या, लाल तिखट, मीठ आणि गरम तेल घाला. पुन्हा एकवार फेटा. मग गरम तेलात याचे पकोडे तयार करा.
  • शिजलेल्या कढीमध्ये पकोडे टाका आणि ५ मिनिटं आणखी मंद आचेवर शिजू द्या. यानंतर सर्व्हिंग बाऊलमध्ये कढी ओता.
  • एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये लाल मिरची परता आणि ही फोडणी कढीवर ओता. वरून फोडणी घातल्यानंतर या पदार्थाला एक वेगळंच रूप मिळतं.

[/one_third]

[/row]