भाजी, रस्सा किंवा मसाले भात यासर्व पदार्थांमध्ये अनेकजण गरम मसाल्यासह, गोडा मसाल्याचा वापर करतात. या मसाल्यामुळे पदार्थाची चव वाढण्यास मदत होते. खरंतर, अनेक ठिकाणी गोड्या मसाल्याला, काळा मसाला असेदेखील म्हंटले जाते. मात्र बाजारातून हा मसाला विकत आणण्यापेक्षा, घरच्याघरी अगदी सोप्या प्रकारे तो तयार करता येतो. आपल्याला फक्त सर्व गोष्टींचे प्रमाण माहित असायला हवे.
तर याच काळ्या किंवा गोड्या मसाल्याची अतिशय साधी सोपी रेसिपी आणि प्रमाण एका आजीबाईंनी vmiskhadyayatra103 नावाच्या अकाऊंटवरून शेअर केली आहे. तसेच, “गरम मसाला जळजळीत असतो, परंतु काळा मसाला हा सौम्य चवीचा असतो. तसेच चिंच-गूळ वापरून बनवलेल्या पदार्थांमध्ये या मसाल्याचा वापर अधिकप्रमाणात केला जात असल्याने कदाचित त्याला गोडा मसाला म्हंटले जात असेल.” अशी माहितीदेखील सांगितली आहे. चला आता झटपट गोड्या मसाल्याचे साहित्य आणि प्रमाण पाहूया.
गोडा मसाला रेसिपी
साहित्य
धणे – १/४ किलो
पांढरे तीळ – ३ चमचे
काळी मिरी – २ चमचे
लवंग – १ चमचा
दगडफूल – १ चमचा
दालचिनीचे तुकडे – २ चमचे
तमालपत्र ८ -१०
जिरे – २ चमचे
हळद – १ चमचा
लाल तिखट – २ चमचे
सुक्या खोबऱ्याचा किस – १/२ वाटी
मीठ चवीनुसार
हेही वाचा : Recipe : कोल्हापुरी रस्सा कसा बनवायचा? अरे गड्या सोपं आहे, ही रेसिपी पाहा….
कृती
सर्वप्रथम गॅसवर एक मोठी कढई ठेऊन, त्यामध्ये एक मोठा चमचा तेल तापवून घ्यावे.
त्यामध्ये सर्व धणे आणि तमालपत्र खमंग होईपर्यंत भाजून घ्यावे.
धण्याचा रंग बदलला आणि तमालपत्र चुरचुरीत झाल्यानंतर, दोन्ही पदार्थ एका ताटामध्ये काढून, थंड करण्यास ठेऊन द्या.
आता पुन्हा त्याच कढईत चमचाभर तेल तापवून घ्यावे.
त्यामध्ये जिरे, काळी मिरी, लवंग, पांढरे तीळ, दगडफूल, दालचिनीचे तुकडे, असे सर्व पदार्थ भाजून घ्यावे.
भाजल्या जाणाऱ्या मसाल्यांचा खमंग वास आल्यानंतर त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस, हळद, तिखट आणि चवीपुरते मीठ घालून सर्व पदार्थ छान भाजून घ्या.
आता कढईतील सर्व पदार्थ एका ताटलीत काढून, त्यांना गार होऊ द्यावे.
धणे आणि बाकी सर्व पदार्थ व्यवस्थित थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये एकत्रित वाटून घ्यावे.
मसाला अगदी बारीक होण्यासाठी सर्व पदार्थ किमान दोनदा मिक्सरवर वाटून घ्यावे.
तयार आहे आपला गोडा किंवा काळा मसाला.
हा मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवल्यास, सहा महिने टिकून राहतो.
महाराष्ट्रीयन पद्धतीचा गोडा मसाला किंवा काळा मसाला तयार करण्याची ही सोपी रेसिपी युट्युबवरील @vmiskhadyayatra103 नावाच्या चॅनलवरून शेअर करण्यात आली आहे.