[content_full]

“मला वाढदिवसाला केक हवा म्हणजे हवा!“ रोहन हटून बसला होता. `अरे मोठा झालास ना तू? आता केक काय आणायचा तुझ्या वाढदिवसाला?` आईनं त्याची समजूत घातली, तरी तो ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्याचाच मित्र असलेल्या आयुषने वाढदिवसाला केक नको, असं सांगून त्या पैशांत गरीब मुलांना मदत केली होती. त्याचं उदाहरण आईनं देऊन पाहिलं, पण तरी रोहननं ऐकून घेतलं नाही. शेवटी आईचा नाइलाज झाला. `केक मिळेल, पण एका अटीवर. आपण बाहेरून केक आणायचा नाही. मी घरी तुझ्या आवडीचा केक करेन,` असं आईनं त्याला सांगितलं. कसाबसा तो तयार झाला. वाढदिवसाला अजून पाच दिवस होते, पण रोहन खूश होता. नेहमीप्रमाणेच धूमधडाक्यात त्याचा वाढदिवस साजरा होणार होता. `आता तू मोठा झाला आहेस. लहानपणीसारखा एवढा मोठा वाढदिवस आपण नको करायला,` असं आईनं त्याला सांगायचा प्रयत्न केला, वडिलांना समजावलं, पण त्यानं ऐकलं नव्हतं. दरवर्षीप्रमाणे सगळ्या मित्रांना बोलावून, केक कापून, गिफ्ट वगैरे घेऊन आणि काहीतरी चांगलंचुंगलं खायला करूनच वाढदिवस साजरा करायचा, हे त्याच्या मनात पक्कं होतं. आईचा नाइलाज झाला आणि तिनं त्या विषयावर बोलणंच सोडून दिलं. त्याच्या मनासारखा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं. आधी वाढदिवसाबद्दल प्रचंड उत्साही असलेला रोहन दोन दिवस आधीपासून थोडासा बदललेला वाटला. आईनं विचारून पाहिलं, पण त्यानं मोकळेपणानं काही सांगितलं नाही. काहीतरी बिनसलं होतं, हे नक्की. वाढदिवसाबद्दल काही झालं का, याचा अंदाज घ्यायचा आईनं प्रयत्न केला, पण त्याबद्दलही काही सुगावा लागला नाही. शेवटी वाढदिवसाचा दिवस उजाडला. कुठल्या मित्रांना बोलवायचं, ते आपण ठरवणार, असं रोहननं सांगितलं होतं, त्यामुळे आईनं त्यातही लक्ष घातलं नाही. त्याच्या सांगण्याप्रमाणे केक तेवढा तयार करून दिला. वाढदिवसासाठी सगळे मित्र जमले आणि एकदम एक वेगळाच मुलगा घरी आला. आईनं ओळखलं, की हा राजा. आपल्या कामवाल्या सुनीताबाईंचा मुलगा. छान नवीन कपडे घालून आला होता. रोहननं त्याला जवळ बोलावलं आणि आईला म्हणाला, `आई, आज राजाचाही वाढदिवस असतो. आत्तापर्यंत त्याच्या वाढदिवसाला कधीच कुणी केक कापला नव्हता. म्हणून त्याला इथे बोलावलं. आज तोच केक कापणार. मी तुझ्याकडे केक करायचा हट्ट धरला, तो ह्याच्यासाठीच!“ असं म्हणून त्यानं राजाला केक कापायला लावला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. रोहननं स्वतः राजाला केक भरवला. आईला भरून आलं होतं. तिला वाटलं, आता खरा मोठा झाला आपला मुलगा!

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • मैदा – २ वाट्या
  • खजूर – १६ नग बिया काढून
  • दूध
  • लोणी – १ वाटी
  • पिठीसाखर – १ वाटी
  • सोडा – १ चमचा
  • बेकिंग पावडर – १ चमचा
  • व्हॅनिला इसेन्स
  • काजू, बदाम काप

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • बिया काढलेले खजूर एक वाटी दुधात २ तास भिजत ठेवणे.
  • भिजल्यावर मिक्समध्ये बारीक करणे.
  • मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा २ वेळा चाळून घेणे.
  • बारीक केलेला खजूर,  लोणी आणि बाकीचे सर्व साहित्य एकत्र करावे.
  • गरजेनुसार दूध घालून सर्व मिश्रण नीट फेसून एकजीव करावे.
  • ओव्हन १८० डिग्री सेंटिग्रेडपर्यंत तापवून घ्यावा
  • मधल्या वेळात योग्य आकाराच्या बेकिंग ट्रेला लोणी/तूपाचा हलका हात लावून त्यावर थोडं मैद्याचं पीठ भुरभूरून (ग्रीसिंग) मिश्रण ओतावे.
  • ड्रायफ्रूटने सजवावे.
  • ओव्हनमध्ये १८० डिग्री सेंटिग्रेडला अंदाजे ३० ते ४० मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत केक बेक करून नंतर ओव्हनमधून बाहेर काढून ठेवावा.
  • केक सामान्य तापमानाला गार झाल्यावर ट्रे मधून काढावा.
    (घरी ओव्हन नसेल, तर तो आणण्यासाठी बायकांनी आपापल्या नवऱ्याकडे तगादा लावायला हरकत नाही.)

[/one_third]

[/row]