गोड पदार्थ खायला अनेकांना आवडतात. त्यात खीर ही अनेकांच्या आवडीची असते. आपल्याकडे प्रत्येक सणासुदीला खीर आवर्जून बनवली जाते. खीर अनेक प्रकारे बनवली जाते, त्यात तांदळाची खीर, गव्हाची खीर, रव्याची खीर असे अनेक प्रकार आहेत. पण आज आम्ही तुम्हाला खजुराची खीर कशी बनवायची याबद्दल सांगणार आहोत. ही खीर केवळ चवीने परिपूर्ण गोड पदार्थ नाही तर ती आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. अगदी कमी साहित्यात तुम्ही ही खीर घरच्याघरी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया खजुराची खीरची झटपट आणि सोपी रेसिपी..
जाणून घेऊया यासाठी लागणारं साहित्य
- दूध १ लिटर
- खजूर १ वाटी
- गूळ पाव वाटी
- तांदूळ १ चमचा
- खवा पाव वाटी
- वेलची पावडर अर्धा चमचा
- सुकामेवा अर्धी वाटी
- तूप १ चमचा
( हे ही वाचा: आता तोंडाला सुटेल पाणी, जाणून घ्या द्राक्षाच्या लोणच्याची चटपटीत रेसिपी)
कृती:
- सुरुवातीला एका पातेल्यात दूध घ्या आणि मध्यम आचेवर गरम करा.
- दुसऱ्या एका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करा आणि त्यात सुक्या मेव्याचे काप परतवून एका वाटीत काढून घ्या.
- खजुराच्या बिया काढून त्या वेगळ्या वाटीत ठेवा.
- एका पॅनमध्ये थोडं पाणी घालून त्यात खजूर झाकण ठेवून वाफवून घ्या. त्यामुळे खजूर मऊ होतात
- त्यानंतर ते मॅश करून घ्या.
- दुधाला उकळी आल्यावर त्यात एक चमचा तांदूळ घालून शिजवा.
- दुधाचे प्रमाण निम्म होईपर्यंत दूध उकळा त्यानंतर त्यात थोडा खवा घालून एकजीव करून शिजवा.
- दूध घट्ट झाल्यावर गॅस बंद करून चवीनुसार गूळ घालून ढवळा.
- त्यात वाफवून मऊ केलेले खजूर घालून ठेवा पुन्हा गॅस सुरु करून खीर शिजवा.
- शेवटी ड्रायफ्रूट्स घालून सजवा.
- खजूर हा चवीला गोड असून शरीराचं बळ वाढवणारा आहे. वजन वाढवायला ही तो मदत करतो. अति भूक लागत असल्यास पोट भरण्यास मदत होते.