[content_full]
पोरांनी धुमाकूळ घातला होता. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पिझ्झा खायला जाण्यासाठी हट्ट चालला होता. वैष्णवी त्यांच्यावर चिडली होती. “नोकरी सांभाळून, हौसेनं मुलांसाठी सगळा फराळ केला आणि ह्यांना तो खाण्याच्या ऐवजी पिझ्झा खायला हवाय!“ वैष्णवी डाफरली. सुमेधनं मध्यस्थी करण्याचा नेहमीप्रमाणेच असलफल प्रयत्न करून पाहिला. आज ती कुणाचंच ऐकत नव्हती. खरंतर परीक्षेच्या काळात दोन्ही मुलांनी दिलेला त्रास, आयत्यावेळी अभ्यास करून घेण्यासाठी तिच्याच मानगुटीवर बसणं, या सगळ्याचा साईड इफेक्ट होता हे सगळ्यांना कळत होतं, पण वैष्णवली ते वळणं कधीच शक्य नव्हतं. मग नाही नाही म्हणताना `आमच्या लहानपणी असं होतं`ची एपी३ वाजली. खरंतर आपल्या लहानपणी आपल्याला अमकं करता आलं नाही, म्हणून आपल्या मुलांना ते आवर्जून करायला देऊया, हे वैष्णवीचं नेहमीचं तत्त्व. मात्र, मुलांनी केलेल्या अशा हट्टाच्या वेळी ते गुंडाळून ठेवून `आम्ही असं केलं असतं, तर आमच्या आईवडिलांनी आम्हाला फोडून काढलं असतं,` याची आठवण का येते, हे तिलाही कळत नव्हतं आणि सुमेधलाही. मुलांना तर अशावेळी आई वेगळीच कुणीतरी वाटत असे. आई चिडली, तरी मुलं आपला हेका सोडायला तयार नव्हती. आता वाटाघाटींसाठी सुमेधनं पुन्हा पुढाकार घेतला. त्यातून असा निष्कर्ष निघाला, की नेहमीचे रव्याचे आणि बेसनाचे लाडू खायचा मुलांना कंटाळा आला आहे. “तुम्हाला कुणी सांगितलं, मी फक्त रव्याचे आणि बेसनाचे लाडू केले आहेत म्हणून? यावेळी मी खजुराचे लाडूसुद्धा केले आहेत!“ वैष्णवीनं रागारागातच सांगितलं. तेवढ्यापुरती तडजोड झाली आणि पिझ्झा रद्द होऊन घरीच सगळ्यांनी फराळावर ताव मारला. खजुराचे लाडू तर मुलांना प्रचंड आवडले. “आई, आमच्यामुळे तुला त्रास झाला, आम्ही नाही पुन्हा हट्ट करणार. छान झालेत लाडू!“ असं मुलांनी सांगितलं, तेव्हा वैष्णवीला आभाळ ठेंगणं झालं. तिनं दोन्ही मुलांना जवळ घेऊन गोंजारलं. “आज खरंच मज्जा आली लाडू खायला. आपण आता दिवाळी झाली की जाऊ पिझ्झा खायला!“ सुमेधनं पिल्लू सोडून दिलं आणि मुलांकडे बघून डोळा मारला.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- २५ खजूर बिया काढून
- अर्धी वाटी बदाम भरडसर वाटून
- १/२ कप किसलेले सुके खोबरे, गुलाबीसर भाजून
- १ टेस्पून तूप
- १ टीस्पून खसखस
- वेलदोड्याची पूड
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- खजुराच्या बिया काढून खजून मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावेत.
- पॅनमध्ये तूप गरम करावे, त्यात खसखस घालून काही सेकंद परतावेत.
- त्यात वाटलेले बदाम, खोबरं आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे.
- नीट मिक्स झाले, की गॅस बंद करून कोमटसर असताना लाडू वळावेत.
- वळताना हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावावे.
[/one_third]
[/row]