[content_full]
कोल्हापुरात जाऊन झणझणीत मिसळ आणि तांबडा-पांढरा रस्सा हाणला नाही, तर त्या गड्याचं काही खरं नाही गड्या! मिसळ आणि रस्सा म्हंजे कोल्हापूरची शान, कोल्हापूरचा मान, अन कोल्हापूरचा अभिमान आसतोय. कोल्हापूरच्या कोंच्यापन चौकात हुभारून नजर टाकली, की मिसळ अन झणझणीत तांबडा-पांढऱ्याची चार दोन दुकानं तरी दिसतातच. कोल्हापूरची मिसळ जेवढी फेमस असती, तेवढाच तिथला कटवडा जागतिक असतोय. कटवडा म्हणून लई ठिकाणी लई प्रकार मिळतात. पण कोल्हापूरला जो कटवडा मिळतो, तेची सर बाकीच्या वड्यांच्या `बा`ला यायची नाही. कटवडा म्हंजे एक साग्रसंगीत कार्यक्रमच असतोय. लई प्रेमानं ते सगळं करावं लागतंय, तरच तो झणझणीतपणा अन तो रंग त्या पदार्थात उतरतोय. या पदार्थातली महत्त्वाची वस्तू म्हणजे तो वडा. तो करायचं एक वेगळंच टेक्निक आसतंय. येकदा का ते टेक्निक हातात बसलं, की स्वैपाकाचं मैदान मारलंच, म्हणून समजा. वडा बेष्टपैकी जमला, की मग कटाकडे वळायचं. कट म्हंजे, वड्याबरोबर खायचा कट. कटाची झणझणीत चव, अन त्यात बुडवलेला वडा, म्हंजे एकदम आsssहा असा प्रकार आसतोय. बाकी तुमच्या कुठल्याबी हाटेलात आन टपरीवर त्यो उसलवडा, शाम्पल वडा, वडा-सांबार आन तसलंच काय काय मिळतंय. पन कोल्हापुरी कटवड्याची चव एकदा चाखलेला माणूस त्या तसल्या हाटेलांच्या आणि टपऱ्यांच्या वाऱ्याला सुद्धा हुभारायचा नाही पुढच्या टायमाला. तर आज शिकूया या कोल्हापुरी कटवड्याचा झणझणीत फार्म्युला. घरी बनवून बघा आणि आम्हाला सांगा. नाय तुम्ही बोटं चाटत ऱ्हायलात, तर कोल्हापूरचं नाव सांगायचं काम नाही. ते तांबड्या-पांढऱ्याचं टेक्निक पुन्हा कधीतरी बघू. काय?
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- वड्यासाठी
- चार उकडलेले बटाटे
- वाटीभर चिरलेला कांदा
- चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या
- ७-८ कढीपत्त्याची पाने
- एक छोटा चमचा हळद
- मूठभर चिरलेली कोथिंबीर
- एक चमचा आले-लसणाची पेस्ट
- फोडणीसाठी-तेल
- हिंग, जिरे, मोहरी
- मीठ
- पारीसाठी
- एक वाटी बेसन पीठ
- हिंग, जिरे, तिखट
- मीठ
- बारीक चिरलेली कोथींबीर
- कढीपत्त्याची पाने
- चमचाभर मोहन
- तळण्यासाठी तेल
- कटासाठी
- एक वाटी कांद्याची पेस्ट
- एक वाटी टोमॅटो पेस्ट / प्यूरी
- एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चव (खोवलेलं खोबरं.)
- एक वाटी फरसाणातील पापडी अथवा गाठी यांचा चुरा
- एक वाटी स्मॅश केलेली बटाटा भाजी
- एक तमालपत्र
- ४ लवंगा
- पेरभर दालचिनिचा तुकडा
- एक टेबलस्पून लसूण पेस्ट
- चवीनुसार मीठ
- लाल मिरचीचे तिखट
- दोन आमसुले
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- वड्यासाठी
- उकडलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्या.
- गॅसवर एका कढईत मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, मिरच्या यांची फोडणी करा. त्यातच कांदा खरपूस परतून घ्या.
- ही फोडणी बारीक केलेल्या बटाट्यांच्या फोडीवर घाला.
- चवीनुसार मीठ घाला.
- आता या मिश्रणात आले-लसणाची पेस्ट मिसळा.
- या मिश्रणाचे लिंबाएवढे अथवा त्यापेक्षा मोठे गोळे बनवून ठेवा.
- पारीचे सर्व साहित्य एकत्र करून पीठ भिजवा.
- वड्यासाठी कढईत तेल तापायला ठेवा. या तेलातले एक चमचा तेल पारीच्या पीठात मोहन म्हणून घाला.
- कढईतील तेलात वडे तळून घ्या.
- कटासाठी
- गॅसवर एका पॅनमध्ये थोड्याशा तेलात तमालपत्र,लवंगा,दालचिनी परतून घ्या.
- त्यावर कांदा पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परता.
- त्यात ओल्या खोबऱ्याचा चव घालुन परता.
- मग टोमॅटो पेस्ट/प्यूरी घालून मध्यम आचेवर शिजवून घ्या.
- हे सगळं मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करा.
- बारीक केलेल्या मिश्रणात बटाट्याची भाजी आणि पापडी अथवा गाठीचा चुरा मिसळा.
- गॅसवर एका जाड बुडाच्या मोठ्या पॅनमध्ये जरा जास्त तेल घ्या.
- तेल तापून धूर येऊ लागला की गॅस बंद करा, तेल किंचित तापायला आलं की त्यात लाल मिरचीचे तिखट घाला. जळू देऊ नका!
- भरभर पळीने हलवत रहा.
- आता त्यात वरील बारीक केलेली पेस्ट घालून पुन्हा गॅस सुरू करा. पाहिजे तेवढं पाणी, मीठ आणि आमसुले घाला.
- चांगली उकळी आली की गॅस बंद करा. झणझणीत तर्रीचा कट तय्यार.
- सर्व्हिंग डिशमध्ये दोन वडे घालून त्यावर कट ओता आणि वर फरसाण, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घाला व थोडासा ओल्या खोबर्याचा चव पसरा अन लिंबाची फोड घालून सर्व्ह करा!
[/one_third]
[/row]