मान्सूनचं आगमन यंदा उशीरा झालं असलं तरी गेल्या आठवड्यात दमदार पाऊस झालाय. विशेषत: मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचा चांगला जोर आहे. पावसाळी वातावरणात गरमागरम आणि चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पौष्टीक आणि स्वादिष्ट अशी कोथिंबीर वडी. चला तर पाहुयात कोथिंबीर वडीची रेसिपी.
कोथिंबीर वडी साहीत्य-
- १ कप बेसन
- १/४ कप तांदळाचे पीठ
- ४ हिरवी मिरची
- १ लसूण
- १चमचा जिरे
- १चमचा हळद
- १/२ चमचा लाल मिरची पावडर
- मीठ चवीनुसार
- तळण्यासाठी तेल
- १ टेबल स्पून तीळ
कोथिंबीर वडी तयार करायची कृती –
- कोथिंबीर एक जुडी घ्यावी. व्यवस्थित साफ करुन बारिक चिरुन पाण्यातून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर कोणत्याही सुती कापडावर पंख्याखाली पसरुन ठेवा. त्यामध्ये पाणी अजिबात राहायला नको.
- आता एक जुडी कोथिंबीरीसाठी एक कप बेसन, पाव कप तांदळाचे पीठ घ्यावे. तांदळाच्या पीठामुळे वडीला कुरकुरीतपणा येतो.त्यानंतर त्यात हिरवी मिरची, लसूण यांची बारीक पेस्ट करून घ्यावी.
- एक चमचा जिरे, एक चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर,मीठ चवीनुसार घ्यावं. आता कोथिंबीरीमध्ये वरील पदार्थ टाकून पीठ चांगले मिसळून त्यात दोन ते तीन चमचे पाणी टाकून पीठ व्यवस्थितपणे मळुन घ्यावे. जास्त पाणी टाकू नये. कोथिंबीरीमध्ये मीठ असल्याने त्याला नंतर पाणी सुटते.
- पीठ पातळ झाले तर वडी कुरकुरीत होणार नाहीत. त्यात थोडे तेल घालून पीठ व्यवस्थितपणे मळुन घ्यावे.पीठात तेल घातल्याने हाताला चिकटणार नाही. नंतर त्याचे रोल्स करून ते वाफवण्यासाठी एक चाळण घ्यावी. त्या चाळणीला तेल लावून घ्यावे. त्यामुळे ते चाळणीला चिकटणार नाहीत. नंतर कढईत पाणी गरम करून त्यावर ही चाळण झाकून १५ मिनिटांसाठी वाफवायला ठेवावी.
- १५ मिनिटांनी झाकण काढून थंड होण्यासाठी ठेवावे.थंड झाल्यावर त्याचे काप करावेत.एका कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर वड्या चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्याव्या. त्यानंतर प्लेट मध्ये टिश्यू पेपरवर वड्या काढून घ्याव्यात असं केल्याने जास्तीचे तेल निघून जाईल.
हेही वाचा – पावसाळ्यात पौष्टीक अशी दुधी भोपळ्याची स्वादिष्ट खीर, लगेच नोट करा सोपी मराठी रेसिपी
- यामध्ये लाल मिरची पावडर टाकल्याने त्याचा रंग लालसर होईल. तुम्ही फक्त लसूण मिरची पेस्ट सुध्दा टाकू शकता. ही वडी इतकी चविष्ट लागते ती अशी खाल्ली तरीही खुप छान लागते.
तुम्ही ही वडी सॉस किंवा चटणी सोबत खाऊ शकता.