[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वयंपाकघरातल्या काही पदार्थांचं स्थान आघाडी सरकारमधल्या छोट्या घटक पक्षांसारखं असतं. म्हणजे म्हटलं तर हे छोटे पक्ष सरकार भक्कम करण्यासाठी महत्त्वाचे असतात. कधीकधी त्यांना सरकारमध्ये सामावून घेऊन मंत्रिपद, इतर काही लाभ दिलेही जातात. पण कधीकधी त्यांना आपल्या स्थानासाठी झगडावं लागतं. `तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात,` असं सांगून कुजवून ठेवलं जातं. धड सत्तेत नाही आणि धड विरोधकही नाही, अशी त्यांची अवस्था होऊन जाते. स्वतः सत्तेत येऊनसुद्धा विरोधकांची भूमिका बजावणारे काही घटक पक्षही असतात, पण सध्या त्यांना बाजूला ठेवूया. तर सांगायचा मुद्दा काय, की हे छोटे घटक पक्ष जेव्हा परवडण्यासारखे असतील, तेव्हा त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात, त्याचं कोडकौतुक केलं जातं. त्यांची किंमत वाढली, की त्यांना सन्मानानं दूर ठेवलं जातं. तरीही ते नजरेसमोर राहतील आणि कधीही हाताशी येतील, अशी व्यवस्था केली जाते. कोथिंबिरीचंही असंच काहीसं आहे. ती स्वयंपाकात असेल, तेव्हा पदार्थाची लज्जत वाढवते, रंगरंगोटी करण्यात मदत करते. पण नसली, तरी फारसं कुणाचं काही अडत नाही. म्हणजे, चव थोडी कमी येत असेल, पण आस्वादात कमतरता येत नाही. कधीकधी महाग म्हणून, तर कधी निव्वळ निवडण्याचा, चिरण्याचा कंटाळा म्हणून कोथिंबिरीवर जाणुनबुजून अन्याय केला जातो. मात्र ती स्वस्त झाली, की तिच्याशिवाय पान हलत नाही. मग भाजी, आमटी, चटणी, कढी, अन्य कुठलाही तिखट पदार्थ, तिच्याशिवाय घशाखाली जातच नाही. फक्त गोडाच्या पदार्थांना तिच्यापासून मुक्ती मिळते. एवढं करून भागत नाही, तर कोथिंबीर चिरून तिच्या वड्या किंवा भजीसुद्धा केली जातात. कुठल्याही भावनेने केलेल्या असोत, कोथिंबीर वड्या लागतात मात्र बेस्ट, हां!

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • १ जुडी कोथिंबीर
  • अंदाजे २ वाट्या बेसन
  • अर्धा टीस्पून हळद
  • २ टीस्पून तिखट
  • १ टेबलस्पून तीळ
  • अर्धा टीस्पून साखर
  • १ टीस्पून तेल
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घ्या.
  • कोरडी होण्यासाठी कापडावर पसरून ठेवा.
  • पूर्ण कोरडी झाल्यावर बारीक चिरून घ्या.
  • त्यात हळद, तिखट, मीठ, साखर, तीळ हे सगळं घालून चांगलं एकजीव करा.
  • १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवून द्या
  • या मिश्रणाला पाणी सुटून ते ओलसर होईल. त्या ओलसरपणात मावेल इतकं डाळीचं पीठ घालून घट्ट भिजवा. गरज वाटल्यासच पाणी घाला.
  • तेलाचा हात लावून मिश्रणाचे रोल करून घ्या.
  • कूकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून त्यात हे रोल ठेवा.
  • कूकरमध्ये नेहमीपेक्षा थोडं जास्त पाणी घालून भांडं कुकरमध्ये ठेवून शिट्टी न लावता 20 मिनिटे वाफवून घ्या.
  • गार झाल्यावर पातळ काप करा.
  • आवडीनुसार शॅलो फ्राय करा किंवा तेलात तळून घ्या किंवा नुसत्या उकडलेल्याही छान लागतात.

[/one_third]

[/row]