[content_full]
काही पदार्थ असे असतात, की जे त्यांच्या मूळ रूपात खाण्यापेक्षा त्यांचं मूळ रूप बदलून, त्यात काहीतरी कलाकुसर करून खाण्यातच मजा असते. फोडणीची पोळी हा असाच एक प्रकार. पीठात तेल, पाणी घालून कणीक मळायची. ती काही काळ भिजवून ठेवायची. पोळपाटावर लाटून तिचे गोल आकार करायचे. हाताला चटके बसू देत ती तव्यावर व्यवस्थित भाजून तिची पोळी करायची. एवढे व्याप करून पोळी तयार करायची आणि तिची चव लागणार, ती भाजी, कोशिंबीर, चटणी नाहीतर आणखी कुठल्यातरी गोड पदार्थाबरोबर. बरं, शिल्लक राहिलेल्या पदार्थांमध्येही पोळीचा भाव जास्त. पण तो तिला कांद्याच्या फोडणीत चटके सोसायला लावल्यानंतर! मूळ पदार्थ करण्यापेक्षा त्याच्यावर नंतर काहीतरी संस्कार करून केलेले पदार्थच असे जास्त चविष्ट होतात. साध्या पोळीला फोडणीच्या पोळीचा किती हेवा वाटत असेल! हाच प्रकार फोडणीची भाकरी, फोडणीचा भात, ब्रेडची भाजी यांचाही. ब्रेड, पोळी, भाकरी, हे पदार्थ तयार करण्यापेक्षा त्यांना फोडणी घालण्याचं काम सोपं, तरीही नंतर घातलेल्या फोडणीचं कौतुकच जास्त. अर्थात, नुसती फोडणी असं जरी म्हटलं, तरी ती घालण्यातलं कौशल्य महत्त्वाचं. त्यातूनही उभा कांदा चिरून, तो छान लालसर परतून मग पोळी केली, तर त्याची चव वेगळी लागते आणि करणाऱ्याचं कौतुकही तेवढंच होतं. कधीकधी वाटतं, की मूळ पदार्थ फोडणीत टाकून हे असं चटपटीत काहीतरी बनवण्याची रेसिपी एखाद्या अपघातातूनच आकाराला आली असावी. कुरडयांची भाजी हासुद्धा असाच एक हेवेखोर प्रकार. कुरडया करण्यासाठी मेहनत घ्यायची, त्या करायच्या, वाळवायच्या, साठवायच्या आणि तळून नुसत्या खाण्याच्या ऐवजी भिजवून त्यांची भाजी करायची. कुरडयांचा जळफळाट होणं स्वाभाविकच आहे ना! आज हीच भाजी शिकूया.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- ७ ते ८ कुरडया
- १ मध्यम कांदा बारीक चिरून
- तेल
- चवीनुसार मीठ
- चवीनुसार तिखट
- कोथिंबीर
- ४ ते ५ कढीपत्त्याची पाने
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- भाजी करायच्या वेळी कुरडया पाण्यात भिजत घालाव्यात. (कुरडया फार वेळ पाण्यात भिजवू नयेत)
- कढईत तेल घालून फोडणी करावी. कांदा खरपूस परतून घ्यावा. तिखट घालावे.
- कुरडयांमधील पाणी काढून कुरडया कढईत घालाव्यात.
- मीठ घालून चांगले परतावे.
- एक वाफ देऊन गॅस बंद करावा.
[/one_third]
[/row]