[content_full]
“तू गोडाचा शिरा चांगला करतेस, पण आमच्या आईच्या हातच्या शिऱ्याची चव नाही!“ हे वाक्य शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांना बाण खुपत नसतील, एवढं पल्लवीला क्षणोक्षणी खुपत होतं. `आमची आई जशी पुरणपोळ्या करते, तशा कुणालाच जमत नाहीत.` `आमची आई गुलाबजाम करायची, ते खाताना आम्ही नुसती बोटं चाटत राहायचो, तरी समाधान व्हायचं नाही`, `आमची आई जशी बटाट्याची भाजी करते, तशी जगात कुठे होत नाही.` ही वाक्यं तर भुताटकीसारखी काही वर्षं झोपेतही पल्लवीच्या कानात घुमत होती. आता बटाट्याची भाजी ही बटाट्याची भाजीच असते. `आमच्या आई`नं केली काय किंवा कुणाच्या आईनं केली काय, त्याची चव बदलत नाही, हे सांगून पाहण्याचा निष्फळ प्रयत्न तिनं अनेकदा केला होता, पण त्यातून भांडणाशिवाय काहीच पदरी पडलं नव्हतं. लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षं पल्लवीनं रात्रीच्या रात्री तळमळून काढल्या. कधीतरी पहाटे चुकूनमाकून डोळा लागला, तर तिला `आमची आई` स्वयंपाकघरात बटाट्याची भाजी करताना दिसायची आणि ती दचकून जागी व्हायची. त्यावेळी `आमच्या आई`चं लाडकं बाळ मात्र शेजारीच घोरत पडलेलं असायचं. सगळे प्रयत्न करून झाले, तरी `आमच्या आई`च्या स्वयंपाकाची सर काही तिला येत नव्हती. तिचं जगणं मुश्किल झालं होतं. …आणि अखेर तो दिवस उजाडला. पल्लवीच्या भाग्याचा दिवस. त्या दिवशी `आमची आई` योगायोगानं त्यांच्या घरी येणार होती. अर्धाच दिवस राहणार होती. दुपारी तिला सोडून घरी आल्यानंतर बराच वेळ बाळ `आमच्या आई`च्या आठवणींवरच तरंगत राहिलं. रात्री जेवताना पल्लवीनं त्याच्या ताटात वाढलेला वेगळा पदार्थ त्यानं बोटं चाटून खाल्ला. “बघितलंस आमच्या आईचं प्रेम? अर्धा दिवस आली होती, तरी येताना उरापोटावरून काकडी घेऊन आली, त्याचे घारगे करून गेली. मला काय आवडतं, हे अजून कळतं तिला!“ `आमच्या आई`च्या बाळानं सुनावलं. “हो, `आमच्या आई`च्या हाताची सर कुणालाच येणार नाही, हे खरंच आहे. पण तू आत्ता जे खाल्लंस, ते काकडीचे घारगे नाहीत, तर भोपळ्याचे घारगे होते.“ पल्लवीनं खुलासा केला. “काय सांगतेस? बघ. मला भोपळा कधी आवडत नाही, पण आमच्या आईच्या हाताला चवच अशी आहे, की…“ त्याचं वाक्य अर्धवट तोडत पल्लवी म्हणाली, “…आणि ते `आमच्या आई`नं नाही, तर मी केले होते. `आमच्या आई`लाही आवडले आणि त्यांना प्रवासातही बांधून दिलेत थोडे.“ त्या दिवसानंतर त्या घरात `आमच्या आई`चा उल्लेख (निदान स्वयंपाकाच्या बाबतीत तरी) कधी झाला नाही! तुमच्या घरीसुद्धा `आमच्या आई`च्या समस्येवरचा उपाय काढायचा असेल, तर भोपळ्याचे घारगे करून बघायला हरकत नाही!
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- २ वाटया – सोललेल्या लाल भोपळ्याचा कीस
- १ वाटी किसलेला गूळ
- मिश्रणात मावेल इतकी कणीक आणि तांदळाचे पीठ (कणकेच्या निम्मे तांदळाचे पीठ)
- १/२ चमचा तेल
- तळणासाठी तेल
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- प्रथम एका कढईत तूप गरम करून त्यात भोपळ्याचा कीस घाला. कीस चांगला वाफवून घ्या.
- कीस अगदी मऊ शिजला की त्यात गूळ घाला. गूळ विरघळू द्या. मिश्रणाला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. त्यात चवीपुरते मीठ घाला.
- नीट मिसळून मिश्रण थंड होऊ द्या.
- मिश्रण थंड झाल्यावर त्यात मावेल तितकं तांदळाचं पीठ आणि कणीक घाला. हे प्रमाण आपल्या अंदाजानंच घ्यावं लागेल. पण
- साधारणपणे कणकेच्या अर्धं तांदळाचं पीठ असावं.
- पुरीला भिजवतो तितपत घट्ट पीठ भिजवा. पाणी वापरू नये.
- पुरीला घेतो तेवढा गोळा घेऊन तो अनारशाप्रमाणे थापा किंवा लाटून घ्या.
- कढईत तेल गरम करून घारगे लाल रंगावर तळून घ्या.
- कुणाला, कुठल्या वेळी आणि काय ऐकवून वाढायचे, हे तुमचं तुम्ही ठरवा.
[/one_third]
[/row]