[content_full]

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाश्चिमात्त्य संस्कृतीचं अंधानुकरण योग्य नाही. पाश्चिमात्त्य देश आपल्यापेक्षा विकासाच्या बाबतीत पुढे आहेत, जास्त शिकलेले आहेत, म्हणजे त्यांना जास्त अक्कल आलेय, अशातला भाग नाही. पाश्चिमात्त्य संस्कृतीमध्ये मोकळेपणा, स्री-पुरुष समानता वगैरे जास्त असल्याचं दिसत असलं, तरी आपली संस्कृती त्यांच्याहून श्रेष्ठ आणि अभिजात आहे. आपल्याकडच्या अनेक गोष्टी त्यांनी शिकण्यासारख्या आहेत आणि ते शिकतही आहेत, आपण त्यांच्या मागे धावत जाण्यात काही अर्थ नाही, वगैरे सगळं खरं असलं, तरी खाण्याच्या संस्कृतीचा विषय येतो, तेव्हा या बाबतीत तावातावाने बोलणारा माणूसही जरा नरमतोच. वागण्याबोलण्याच्या संस्कृतीची आणि खाद्यसंस्कृतीची गल्लत करता कामा नये, असं तो आवर्जून सांगतो. त्याचं मुख्य कारण असतं, की कुठल्याही देशातले आपण आपलेसे करून घेतलेले पदार्थ. आपले म्हणून आपण जे पदार्थ मिरवतो, त्यातले काही घटकही मूळचे पाश्चिमात्त्य आहेत, हे सांगून पटणार नाही. आईस्क्रीमसारखा पदार्थ जर आपण आहारातून वर्ज्य केला, तर जगण्यासाठी दुसरं उरतंच काय? पुडिंग हासुद्धा पाश्चात्त्य देशांतून आपल्याकडे आलेला आणि आता चांगलाच लोकप्रिय झालेला एक पदार्थ. हा गोड पदार्थ जेवणाबरोबर खावा की जेवणानंतर, असा एक वाद असू शकतो. पण तो खावा की नाही, याबद्दल मात्र वाद घालण्यात अर्थ नाही. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात ब्रिटनच्या रॉयल नेव्हीच्या जहाजावर पुडिंगचा सगळ्या जेवणांमध्ये समावेश असायचा. आता तो अगदीच कॉमन प्रकार झाला आहे. पुडिंग बनविण्याआधी वेगवेगळे जिन्नस एखाद्या धान्यात एकत्र करून किंवा लोणी, पीठ, अंडं, असे पदार्थ वापरून तयार केले जायचे. आता पद्धती बऱ्याच बदलल्या आहेत. आज आपण लेमन पुडिंग शिकूया. सफरचंद, कॅरमल-कस्टर्ड, जेली, अशा अनेक प्रकारच्या पुडिंगचे प्रयोगही करून बघता येतात, बरं का! आणि सॉल्टी की स्वीट, ही निवडसुद्धा आपापल्या आवडीनुसार!

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • २ चमचे लोणी
  • पाऊण वाटी साखर
  • १ मोठे लिंबू
  • १ कप दूध
  • २ अंडी
  • २ चमचे मैदा
  • चिमूटभर मीठ

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • अंड्यातले पिवळे व पांढरे वेगवेगळे करून वेगवेगळे फेटावे.
  • लिंबाची साल कापून किसून घ्यावी
  • लिंबाचा रस काढून वेगळा ठेवावा.
  • मैदा मीठ घालून चाळून घ्यावा.
  • लोणी व साखर एकत्र करून खूप फेटावे.
  • लोणी-साखरेच्या मिश्रणात चाळलेला मैदा, लिंबाच्या सालीचा कीस, लिंबाचा रस, अंड्यातला फेटलेला पिवळा भाग व दूध घालून मिश्रण चांगले घोटून घ्यावे.
  • अंड्यातला फेटलेला पांढरा भाग हळूहळू मिश्रणात घालून पुन्हा एकजीव होईपर्यंत घोटावे.
  • ओव्हनमध्ये ठेवण्यासाठी ओव्हनप्रूफ भांडे आतल्या बाजूने ग्रिसिंग करावे व त्यात हे मिश्रण ओतावे.
  • दुसऱ्या ट्रेमध्ये पाणी घालून त्यात मिश्रणाचे भांडे ठेवावे. ओव्हनमध्ये 180 डिग्रीला ३० ते ४० मिनिटे भाजावे. लज्जतदार पुडिंग तयार!

[/one_third]

[/row]

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make lemon pudding maharashtrian recipes