आपल्या आहारात भाज्यांचा समावेश करावा असे सगळे सांगत असतात. मात्र भाज्यांप्रमाणेच काही भाज्यांच्या सालीदेखील उपयुक्त असतात. इतकेच नाही तर त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. आता उदाहरण घ्यायचे झाले तर, दोडक्याचे घेऊ. दोडक्याची भाजी आरोग्यासाठी चांगली तसेच; त्याचबरोबर चवीलादेखील खूप सुंदर लागते. त्याचप्रमाणे या भाजीच्या सालींचा वापर करूनसुद्धा आपण मस्त झणझणीत असा पदार्थ बनवू शकतो.
दोडक्याची सालं वापरून तुम्ही चविष्ट आणि चटपटीत असा ठेचा अगदी झटपट बनवू शकता. या ठेच्याची रेसिपी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर familyrecipesmarathi नावाच्या अकाउंटने शेअर केली आहे. चला मग, आज दोडक्याच्या सालींपासून चविष्ट असा ठेचा कसा बनवायचा ते पाहूया.
हेही वाचा : Recipe : कैरीच्या आंबट-गोड गोळ्या कशा बनवायच्या? अचूक प्रमाणासह पाहा ही रेसिपी
दोडक्याच्या सालींचा ठेचा :
साहित्य
दोडकी
हिरव्या मिरच्या
लसूण
कोथिंबीर
शेंगदाणे
जिरे
मीठ
तेल
कृती
सर्वप्रथम दोडकी पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्या. ती धुवून झाल्यानंतर सोलाण्याच्या मदतीने दोडक्याची साले सोलून घ्यावी.
आता एका मिक्सरच्या भांड्यात डोलावून घेतलेली दोडक्याची साले, तीन ते चार गडद हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घालून घ्या.
सर्व पदार्थ मिक्सरला वाटून बारीक करून घ्यावे. आता यामध्ये थोडे शेंगदाणे घालून पुन्हा सर्व पदार्थ वाटून घावे.
आता एक खोलगट तवा गॅसवर मध्यम आचेवर ठेवा.
तव्यावर चमचाभर तेल घालून ते तापू द्यावे. तेल तापल्यानंतर, त्यामध्ये चमचाभर जिरे घाला.
जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले ठेच्याचे वाटण घालून घ्या.
तेलात दोडक्याच्या सालीचे वाटण मस्त परतून घ्यावे.
आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या.
पुन्हा एकदा तयार होणारा ठेचा मंद आचेवर खमंग परतून घ्यावा.
तयार आहे आपला झणझणीत आणि चविष्ट असा दोडक्याच्या सालीचा ठेचा. हा ठेचा तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता.
दोडक्याच्या सालीचा वापर करून बनवलेला असा हा सुंदर आणि सोपा पदार्थ इन्स्टाग्रामवरील @familyrecipesmarathi या अकाउंटवरून शेअर झालेला आहे. या ठेचा रेसिपी व्हिडीओला आत्तापर्यंत ३१.१K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.