[content_full]
नावाचा महिमा अगाध आहे. कुणाचं काय नाव असावं, हे आपण ठरवू शकत नाही. त्याचे आईवडील ठरवतात, तेव्हा ते काहीतरी विचार करूनच ठरवत असतात. किंबहुना, असावेत. तरीही `हा आमचा विनोद,` `ही आमची इतिश्री,` `हा आमचा विनय,` अशी ओळख पाहुण्यांना करून देताना आईवडील कुठून धैर्य गोळा करतात, कोण जाणे. तर ते असो. नावात काय आहे, असं शेक्सपिअर का कुणीसा सांगून गेला असला, तरी त्याचं नाव आपल्या लक्षात राहतंच. नाव काय आहे याच्यापेक्षा त्या व्यक्तीनं आयुष्यात किती नाव कमावलंय, हे महत्त्वाचं. आणि नावावरून कुणाला नाव ठेवू नये, हेसुद्धा महत्त्वाचं. कारण आत्ताच्या वेगवान जमान्यात कुणाचं कधी नाव होईल, याचा काही नेम नाही. `नरेंद्र दामोदरदास मोदी,` हे नाव आधी प्रसिद्ध होतंच, पण शपथविधीनंतर ते जास्त प्रसिद्ध झालं. काही मुलांची नावंही फार मजेशीर असतात. `नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा,` ही म्हण तर आपल्याला माहितीच आहे. तसंच, नरसिंहराजे असं नाव असणारा माणूस कदाचित झुरळालासुद्धा घाबरणारा असू शकतो. विनय नाव असलेला माणूस अतिशय उर्मट असू शकतो. सूरश्री नावाच्या मुलीला गाण्यातलं ओ की ठो कळत नाही, असंही शक्य आहे. श्रद्धा नावाची मुलगी अतिशय अंधश्रद्धाळू नसेलच, कशावरून? काही पदार्थांच्या नावाचंही तसंच आहे. `घोसावळं` हे काही फार अभिमानानं सांगण्यासारखं भाजीचं नाव आहे का? पण एकदा त्याची चुरचुरीत भजी खाल्लेला माणूस पुन्हा जन्मात त्याचं नाव विसरू शकत नाही. तसंच धोंडस या पदार्थाचं आहे. नाव ऐकायला फारसं गोंडस नसलं, तरी त्याची चव मात्र कायम जिभेवर रेंगाळणारी आहे. मालवण भागात लोकप्रिय असलेला हा पदार्थ कसा करायचा, ते आज शिकूया.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- तांदूळ १ वाटी
- पिकलेल्या मोठ्या काकडीचा कीस (दीड ते दोन वाट्या)
- चांगले भिजवेलेले ओल्या खोबऱ्याचे काप (मध्यम आकाराचा साधारण एक नारळ)
- चण्याची डाळ (अर्थी वाटी)
- शेंगदाणे (भाजून भिजवलेले) अर्थी वाटी
- गूळ (१ वाटी)
- तूप (२ ते ३ चमचे)
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- तांदूळ भिजवून सुकवून घ्यावेत.
- तांदूळ वाळल्यावर ते मिक्सरवर जाडसर (चुरी) वाटून घ्यावेत. कण्या राहतील, इतपतच वाटावा.
- एक मोठी पिकलेली काकडी साल काढून किसून घ्यावी.
- एका पसरट भांड्यात तूप तापवून, त्यात तांदळाची चुरी परतून घ्यावी.
- त्यात किसलेली काकडी, भिजवलेले ओल्या खोबऱ्याचे काप, चण्याची डाळ तांबूस होईपर्यंत भाजावेत. भिजवलेले शेंगदाणे आणि चवीनुसार गूळ घालावा.
- हे मिश्रण परतवून घ्यावे, नंतर मिश्रणाच्या प्रमाणात पाणी घालावे.
- हे मिश्रण चांगले शिजवून घ्यावे.
- नंतर या मिश्रणाचे भांडे निखाऱ्यावर किंवा गरम तव्यावर काही काळ ठेवावे. मिश्रण लालसर-खरपूस होईल.
- थंड झाल्यावर त्याच्या वड्या करून त्याच्यावर काजू-बदामाचे काप घातले, की धोंडस तयार!
[/one_third]
[/row]