[content_full]
कडधान्य हा प्रकार ज्यानं कुणी पहिल्यांदा शेतात लावला, त्याला २४ तोफांची आणि ज्यानं कुणी त्याच्यापासून वेगवेगळे खाद्यपदार्थ करायचं शोधून काढलं, त्याला ४८ तोफांची सलामी द्यायला हवी. कमी तिथे आम्ही, या न्यायानं कडधान्य कधीही, कुठल्याही वेळी उपयोगी पडतात. कांदाबटाट्याच्यानंतर स्वयंपाकघरात महत्त्वाचं स्थान कुणाला असेल, तर ते कडधान्याला. पुलंचा `नारायण` आहे ना, तसं कडधान्याचं काम असतं. नारायणाला लग्नाच्या वेळी तरी प्रचंड किंमत असते. कपडेखरेदीपासून वधूसाठी सजवलेली गाडी आणण्यापर्यंत सगळ्या गोष्टी हा नारायण करत असतो. लग्न झाल्यानंतर मात्र त्याला सगळे विसरून जातात. कडधान्याचं तसं नाही. रोजच्या भाजीच्या वेळी, वेगळं काही करायच्या वेळी कुणाला कडधान्याची आठवण होत नाही. पण मंडई बंद असेल, भाज्या महाग झाल्या असतील, त्यांचा कंटाळा आला असेल, तर स्वयंपाकघरातल्या कुठल्यातरी एका कोपऱ्यातल्या बरणीत निमूटपणे बसलेली कडधान्यं नक्की आठवतात. नाश्त्याचे चवीचे खमंग प्रकार करायचे असतील, तेव्हा मात्र कडधान्यांना जास्त भाव दिला जातो. मिसळीमध्ये मटकी, हरभरा, वाटाणा, यांची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही. कडधान्यांपासून बनणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींपासून धिरडी, घावन, डोसे, इडल्या, उत्तप्पा, आंबोळ्या, पराठे, असे असंख्य प्रकार तयार होतात आणि चवीने खाल्ले जातात. हे प्रकार करण्याची कृती साधारण एकच असते. कुठल्या कुठल्या डाळींना रगडून, एकत्र करून, त्यात मिरची, आलं, लसूण, मसालेबिसाले घालून, तव्यावर थापायचं असतं. पण ते थापण्याची पद्धत, जाडी, रुंदी, यावरून त्यांचा प्रकार ठरतो. नाव आणि पद्धत कुठलीही असो, हे प्रकार चवीला असतात भन्नाट. आज बघूया, तळकोकणात, अर्थात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकप्रिय असलेला, डाळींपासून तयार होणारा एक गोडाचा पदार्थ.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- १ वाटी तांदूळ
- अर्धी वाटी उडीद डाळ
- पाव वाटी चणा डाळ
- पाव वाटी मूग डाळ
- २ चमचे सुके धने
- ४ ते ५ मेथीचे दाणे
- अर्धी वाटी जाडे पोहे
- चवीपुरते मीठ
- चवीपुरते जिरे
- नारळाच्या दुधासाठी
- एका नारळाचे किसलेले खोबरे
- एक वाटी किसलेला गूळ
- वेलची. (चवीनुसार)
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- तांदूळ आणि डाळी वेगवेगळ्या प्रत्येकी तीन तास भिजवाव्यात.
- डाळी एकत्र करून मिक्सरवर एकत्र करून घ्याव्यात. (मिक्सरवर बारीक करतानाच त्यात धने, जिरे, मीठ आणि मेथीचे दाणे टाकावेत.)
- आंबवण्यासाठी हे मिश्रण आणखी तीन तास तसेच झाकून ठेवावे
- तीन तासानंतर या मिश्रणात पोहे धुवून मिसळावेत.
- तवा तापवून त्याला थोडे तेल लावून या मिश्रणाचे पुऱ्यांपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या खापरोळ्या कराव्यात.
- नारळाच्या दुधात बुडवून खायला छान लागतात.
- नारळाचे दूध
- एका नारळाचे खोवलेले खोबरे किंचित पाणी घालून मिक्सरवर बारीक करावे. ते करतानाच त्यात चवीनुसार वेलची घालावी. बारीक झाल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. नारळाचे दूध बाजूला झाल्यानंतर चोथा काढून टाकावा. दुधात गूळ कालवावा.
[/one_third]
[/row]