[content_full]

आज बायकोच्या आग्रहावरून त्यानं रजा घेतली होती. आजचा दिवस त्याला फक्त घरासाठी द्यायचा होता. मस्त आराम करायचं त्यानं ठरवलं होतं, तरी नेहमीच्या सवयीमुळे त्याला सकाळी जाग आली आणि बायकोला अनोखं सरप्राइज द्यायचा बेत त्याच्या डोक्यात शिजायला लागला. आज मंडईत जाऊन भाज्या आणाव्यात आणि तिच्यासाठी एखादा झकास पदार्थ करावा, असं त्याला वाटलं आणि त्यानं स्वतःच्या भन्नाट कल्पनेवर स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. एका ठिकाणी ठेवलेल्या पैशांच्या नोटा त्याला सापडल्या आणि त्यानं उडीच मारली. दोन पिशव्या नाचवत तो बायकोच्या नकळत घराबाहेर पडला आणि बाइकवर टांग मारून त्यानं थेट मंडई गाठली. दिवसभर संपूर्णपणे सोशल मीडियापासून सुटका करून घेण्याचा त्याचा विचार होता. म्हणूनच आदल्या रात्रीपासून त्यानं टीव्ही, मोबाईल काहीही बघितलेलं नव्हतं. बाजारात लोक घोळक्या घोळक्यानं पाचशे आणि हजारच्या नोटांबद्दल काहीतरी चर्चा करत असलेलं त्याला ओझरतं दिसलं, पण त्यानं तिकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. स्वतः करून आणलेली यादी त्यानं पुन्हा पुन्हा तपासली आणि गाडी सुरक्षित ठिकाणी पार्क करून तो पिशव्या नाचवत खरेदीसाठी मंडईच्या मैदानात उतरला. हव्या त्या सगळ्या भाज्या त्यानं मनसोक्त खरेदी केल्या. प्रत्येक ठिकाणी सुट्या नोटा आणि पैसे देताना भाजीवाल्याच्या चेहऱ्यावर अमाप आश्चर्य, कृतज्ञतेबरोबरच संशयही का दाटून येत होता, हे काही त्याला कळलं नाही. एका भाजीवालीनं त्याला एवढं सामान कशासाठी असं विचारल्यावर, चायनीज सूप करायचं असल्याचं तो नकळत बोलून गेला आणि `काय देशभक्ती वगैरे हाय का नाय,` असंही त्याला ऐकून घ्यावं लागलं. त्याकडे दुर्लक्ष करून, दोन्ही पिशव्या काठोकाठ भरून तो घरी आला. बायको दारातच त्याला अडवून रागाने रोखून बघत उभी राहिली, तेव्हाच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आजच मंडईत गेल्याबद्दल आणि एवढ्या भाज्या आणल्याबद्दल त्याला भरपूर बोलणी खावी लागली. आपलं काय चुकलं, हेच नेमकं त्याला कळत नव्हतं. तेवढ्यात ती म्हणाली, “सगळे सुट्टे पैसे संपवून आलास ना? मोठ्या कष्टानं आजच ब्यूटी पार्लरची अपॉइंटमेंट मिळाली होती मला. त्यासाठी घरातल्या शंभर, पन्नासच्या नोटा शोधून शोधून बाजूला काढून ठेवल्या होत्या. आता पार्लरमध्ये काय देऊ? चिंचोके?“

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • १ टीस्पून तेल
  • ५ मोठ्या लसूण पाकळ्या, एकदम बारीक चिरून
  • १ इंच आल्याचा तुकडा, सोलून बारीक चिरून
  • १ ते २ हिरव्या मिरच्या
  • १ कप भाज्या, बारीक चिरून – भोपळी मिरची, गाजर, कोबी, कांद्याचा पातीचा पांढरा भाग
  • ३ कप  व्हेजिटेबल स्टॉक  (दोन लिटर पाण्यात थोडे गाजराचे तुकडे, कोबीची पाने, फ्लॉवरचे  तुकडे, कोथिंबिरीचे  देठ, कांद्याच्या पातीचे देठ, कांद्याची पात, फरसबीचे तुकडे आणि मीठ घालून 10 मिनिटे उकळावे. पाणी गाळून सुपासाठी वापरावे.)
  • १ टीस्पून सोया सॉस
  • १/२ टी स्पून व्हिनेगर
  • १/२ टेस्पून टोमॅटो केचप
  • १/२ टी स्पून चिली सॉस
  • १ टी स्पून कॉर्नफ्लोअर
  • चवीपुरते मीठ
  • सजावटीसाठी कांद्याचा पातीचा हिरवा भाग
  • १/४ कप शेवया

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • कढईत चमचाभर तेल गरम करावे. त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण परतावे. मिरची घालून परतावे.
  • त्यावर चिरलेल्या भाज्या घालून अर्ध्या कच्च्या शिजवाव्यात.
  • मीठ घालावे.
  • भाज्या अर्धवट शिजल्या कि ३ कप व्हेजिटेबल स्टॉक घालावा.
  • एक उकळी आली की एक टी स्पून सोया सॉस, टोमॅटो केचप आणि चिली सॉस घालून उकळवावे.
  • एक टी स्पून कॉर्नफ्लोअर १/४ कप पाण्यात मिक्स करून सूपमध्ये घालावे. गुठळ्या होऊ देऊ नयेत.
  • उकळी आल्यावर व्हिनेगर घालावे.
  • सर्व्ह करताना बाऊलमध्ये सूप घालून कांद्याची पात आणि शेवया घालून सजवावे.
  • शेवया : चायनीज नूडल्स पाण्यात उकळवून साधारण ८० ते ९० % शिजवून घ्याव्यात. शिजवलेल्या शेवया तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळाव्यात.

[/one_third]

[/row]

Story img Loader