[content_full]
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे की नाही? दाक्षिणात्य राज्यांना ती मान्य का नाही? ही राज्यं जो स्वाभिमान दाखवतात, तो महाराष्ट्रासारखी राज्यं का दाखवत नाहीत? आपण आपल्या राज्यात बाहेरून आलेल्या लोकांबरोबर त्यांच्या हिंदी भाषेत (म्हणजे, हिंदीसारख्या वाटणाऱ्या कुठल्यातरी भाषेत!) का बोलतो? त्यांनी आपली भाषा शिकली नाही, तर त्यांचं घोडं कुठे अडत का नाही? भाषेचा अभिमान बाळगायचा म्हणजे दुसरी भाषा शिकायची की नाही? या प्रश्नांची उत्तरं कधी मिळोत न मिळोत, विविधतेनं नटलेल्या आपल्या देशात खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत मात्र हे वाद नाहीत. अमूक एका राज्याचा हा पदार्थ आहे म्हणून तो आम्हाला चालणार नाही, तमूक राज्याचा पदार्थ आम्ही आमच्या राज्यात शिजू देणार नाही, विकू देणार नाही, यावरून (अजून तरी!) वाद पेटलेले नाहीत. त्याची दोन कारणं असू शकतात. एकतर सगळ्या भागातल्या लोकांना कुठल्याच विशिष्ट पदार्थाबद्दल अढी नाही किंवा दुसरं म्हणजे राजकीय लोकांचं अजून या विषयाकडे लक्ष गेलेलं नाही किंवा वाद पेटवण्याएवढा राजकीय फायदा त्यांना त्यात दिसलेला नाही. म्हणूनच दक्षिणेचा इडली-डोसा उत्तरेला चालतो, तसाच उत्तरेचा पराठा-भटूरा दक्षिणेलाही चालतो. कधीतरी चवीत बदल म्हणून रोजच्या आहारातले पदार्थ सोडून सगळे लोक वेगवेगळ्या प्रांतातल्या पदार्थांची चव चाखत असतात. इडली, डोसा आणि त्याच्या इतर प्रकारांना तर मरण नाही! दरवेळी वेगळ्या डाळीचं किंवा धान्याचं पीठ वापरून इडली आणि डोसा या दोन्ही पदार्थांचे वेगवेगळे प्रकार करून बघता येतात. विशेषतः कमी तेलकट आणि पचायला हलके असल्यामुळे ते सगळ्यांनाच आवडतात. आज बघूया, मसाला इडली हा एक चविष्ट आणि वेगळा पदार्थ.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- २ वाट्या उकडा तांदूळ
- १ वाटी उडीद डाळ
- अर्धी वाटी चणा डाळ
- पाव चमचा हिंग
- १ चमचा काळी मिरी
- १ टी. स्पून जीरे
- थोडे आले किसून
- थोडा कढीलिंब
- थोडे काजूचे तुकडे
- चवीनुसार मीठ
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालावे.
- सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे.
- पिठात जिरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ घाला.
- थोडे तेल गरम करुन काजू तुकडे व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला.
- आले किसून घालून पीठ खूप फेटावे.
- पीठ फेटून इडली स्टॅंडवर इडल्या वाफवून घ्याव्यात.
- चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.
[/one_third]
[/row]