[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पराठा हा कुठल्याही ऋतूमध्ये, कुठल्याही वेळी चालणारा, सगळ्यांना आवडणारा पोटभरीचा पदार्थ आहे. अर्थात, पावसाळ्यात किंवा थंडीत गरमागरम पराठा आणि त्याबरोबर झणझणीत चटणी, लोणी, तूप किंवा दही, याची चव वेगळीच असते म्हणा. भाज्या, आलं, लसूण, मिरची किंवा असलंच काहीतरी मिश्रण कणकेच्या गोळ्यात घालून ते लाटून, भाजून त्याचा लज्जतदार पराठा करण्याचा शोध ज्यानं किंवा जिनं कुणी लावला असेल, तिला साष्टांग दंडवतच घालायला हवा. महाराष्ट्रात जितकी पुरणपोळी लोकप्रिय आहे, तेवढाच उत्तर भारतात पराठा प्रसिद्ध आहे. उत्तर भारतातला नाश्ता किंवा जेवण पराठ्याशिवाय पूर्णच होत नाही, असंही म्हणायला हरकत नाही. भारतीय लोकांना मसालेदार खाणं जास्त आवडतं. लवंग, वेलची, जायफळ, तमालपत्र, दालचिनी, मिरची, असले वेगवेगळे प्रकार एकत्र करून केलेला मसाला, वर कांदा, लसूण, आलं, यांची साथ असेल, तर मसाल्याला भन्नाट चव येते. पराठ्यांच्या मिश्रणातही हेच मसाले रंगत आणतात. कणकेत भरण्याचं हे सारण किंवा मिश्रण जेवढं जास्त मसालेदार आणि खमंग, तेवढी पराठ्याची चव वाढते. अगदी आलू पराठ्यापासून लच्छा पराठा, पनीर पराठा, मिक्स व्हेज पराठा, मुळ्याचा पराठा, असे अनेक प्रकार अस्तित्त्वात आहेत आणि ते सगळेच लोकप्रिय आहेत. दिल्लीसारख्या ठिकाणी तर लाल किल्ल्यासमोर खास पराठा गल्ली आहे. ही गल्ली आणि तिथले वेगवेगळ्या चवीचे पराठे ही दिल्लीची आणखी एक ओळख आहे. तिथल्या पराठ्यांची चव चाखल्याशिवाय आणि त्यांची तारीफ केल्याशिवाय दिल्लीची सहल पूर्ण होऊच शकत नाही. अर्थात, तेवढाच खमंग आणि खुसखुशीत पराठा घरीसुद्धा बनवता येतो. बाहेरच्या पराठ्यांमध्ये मैद्याचा वापर जास्त असतो. तो टाळून घरी कणकेपासूनही उत्तम पराठा बनू शकतो. आज आपण बघूया, मसाला पराठ्याची रेसिपी.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • एक चमचा धनेपूड
  • एक चमचा जिरे पूड
  • चार चमचे गरम मसाला
  • चिरलेली कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • पाव चमचा पिठीसाखर
  • दोन-तीन चमचे तीळ
  • बटर
  • दोन वाट्या गव्हाच्या पीठाची भिजवलेली कणीक

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • तीळ सोडून सर्व मसाले एकत्र कालवावेत.
  • कणकेचा एक गोळा घेऊन फुलक्याएवढी पोळी लाटावी.
  • पोळीला बटर लावावे.
  • तयार मसाल्यापैकी 1 चमचा मसाला पोळीवर पसरून त्याचा घट्ट रोल करावा.
  • रोल चकलीप्रमाणे घट्ट वळवावा. तिळ टाकून दाबावा.
  • पीठ लावून जाडसर पराठा लाटावा.
  • तेल सोडून खरपूस भाजून घ्यावा. चटणी, दही, तूप किंवा लोणच्याबरोबरही गरम पराठा छान लागतो.

[/one_third]

[/row]