[content_full]
स्वयंपाक करायला शिकणारा प्रत्येक मराठी माणूस पहिल्यांदा कुठला पदार्थ करायला शिकला, असा सर्व्हे घेतला गेला, तर नक्कीच उत्तर मिळेल, ते म्हणजे कांदेपोहे. प्रत्येक घरात, सर्वाधिक वेळा तयार होणाऱ्या पदार्थांच्या यादीत कांद्यापोह्याला दुसरा कुणी स्पर्धक नसेल. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याची अगदी सोपी पाककृती आणि कमीत कमी साहित्य आणि वेळ. खरंतर कांदा आणि पोहे, एवढ्या दोनच मूळ साहित्यांपासून बनवला जाणारा हा पदार्थ असला, तरी त्याचं वैविध्य आणि चवींचे प्रकार एवढे आहेत, की बास्स! तांदळापासून बनवले जाणारे पोहे प्रत्येक ठिकाणी सहज उपलब्ध असणं, हेही या पदार्थाच्या लोकप्रियतेचं आणखी एक कारण. अचानक पाहुणे आल्यानंतर किंवा दर प्रत्येक घरात आठवड्यातून किमान दोनदा हा पदार्थ बनवला जातोच! कमी खर्चिक तर आहेच, पण बनवायला अगदी सोपा आणि कमी वेळ घेणारा. त्यातून सगळ्यांच्या आवडीचा. म्हणूनच लग्नासाठी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात अगदी आवर्जून हा पदार्थ केला जातो आणि त्यावरूनच त्या सोहळ्याचंही `कांद्यापोह्याचा कार्यक्रम` असं बारसं झालंय. हे खरं कांद्यापोह्याचं माहात्म्य. कांद्याऐवजी बटाटा, टोमॅटो, किंवा वांगं, शेंगदाण्यांऐवजी मटार, मिरचीऐवजी लाल तिखट, असं साहित्य घालूनही पोहे केले जातात. या वेळी देतोय, मसाला पोह्यांची कृती. घरी करून बघा आणि आम्हाला कळवा!
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- ४ मूठ जाड पोहे
- १ मध्यम कांदा
- २ मध्यम आकाराची वांगी
- गरम मसाला (चवीनुसार)
- लाल तिखट
- फोडणीसाठी : मोहोरी, जिरे, हळद, 5-6 कढीपत्ता पाने तेल, चवीपुरते मीठ
- १ लहान चमचा साखर
- लिंबू
- वरून पेरण्यासाठी चिरलेली कोथिंबीर, खवलेला नारळ[/two_thirds]
[one_third]
पाककृती
जाड पोहे चाळणीत घालून भिजवावेत. त्यातील पाणी निथळून गेले की त्याला थोडे मीठ आणि साखर लावून घ्यायची. कांदा बारीक चिरून घ्यावा, वांग्याच्या फोडी कराव्यात. कढईत तेल गरम करावे. त्यात त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता घालावा. कांदा घालावा, तांबूस होईस्तोवर परतून घ्यावा. वांग्याच्या फोडी घालाव्यात चांगल्या शिजू द्याव्यात. कांदा आणि वांग्याच्या फोडी शिजल्या की त्यात हळद, तिखट आणि गरम किंवा गोडा मसाला घालावा. भिजवलेले पोहे घालावेत. आणि डावाने निट मिक्स करावे. तेल आणि परतलेला साहित्य सर्व पोह्यांना लागेल याची काळजी घ्यावी. मध्यम आचेवर वाफ काढावी. गरज वाटल्यास थोड्या पाण्याचा हबका मारावा तसेच आवश्यक वाटल्यास मीठ घालावे. काही मिनिटे वाफ काढावी. सर्व्ह करताना पोह्यांवर लिंबू पिळावे आणि वरून चिरलेली कोथिंबीर व खोवलेला नारळ घालावा.
(आपल्या आवडीचा कोणाताही मसाला वापरून पोहे करता येतील.)
[/one_third]
[/row]