[content_full]
कधीही कुणालाही घरी न बोलावणारे वामनराव आज आपल्याला चक्क नाश्त्याला बोलावत आहेत, याचं दिनकरभाऊंना प्रचंड आश्चर्य वाटलं होतं. या सोसायटीत राहायला येऊन पंधरा वर्षं झाली, दोघांचे फ्लॅटही समोरासमोर होते, पण कधी वामनरावांच्या घरी जायचा योग आला नव्हता. कसा येणार? त्यांनी कधी बोलावलंच नव्हतं. त्यांनाच काय, सोसायटीतल्या कोणालाही तो योग येणं जरा अवघडच होतं. वामनराव होतेच तशी कीर्ती बाळगून. त्यांच्या घरी आपल्याला कधी चहासुद्धा मिळेल, याचीही आशा आता सगळ्यांनी सोडली होती. आणि त्याच वेळी दिनकरभाऊंना अचानक त्यांनी घरी फक्त चहाला नव्हे, तर नाश्त्याला बोलावलं होतं. ८०, ९०च्या काळातल्या हिंदी सिनेमातल्या हिरॉइनला `सुहागरात`च्या वेळी डोक्यावर पदर घेऊन सजवलेल्या बिछान्यावर बसलेल्या अवस्थेत मनात जेवढी हुरहूर दाटत नसेल ना, तेवढी दिनकरभाऊंच्या मनात दाटली होती. कुठले कपडे घालावेत, गेल्यावर पहिल्यांदा काय बोलावं, याच्या तयारीतच त्यांचा बराच वेळ गेला. तसं फक्त फ्लॅटचं दार उघडून पाच सहा पावलं चालून समोरच्या फ्लॅटमध्येच जायचं होतं, पण हा प्रवास करायलाही दिनकरभाऊंना पंधरा वर्षांची तपश्चर्या करावी लागली होती. आज त्यांना जगातला सगळ्यात सुखी माणूस असल्यासारखं वाटत होतं. शेवटी तो क्षण आला. दिनकरभाऊ वामनरावांच्या घरी गेले. वामनरावांनी हसून, उत्साहानं स्वागत केलं आणि त्यांच्या बायकोनं प्रेमानं केलेल्या चक्क दोन मटार करंज्या त्यांना खायला घातल्या. तृप्तीचा, समाधानाचा (आणि करंज्यांचा) ढेकर देऊनच ते तिथून बाहेर पडले. त्यांची बायको नेमकी बाहेर गेली होती, ती नुकतीच परतली होती. दिनकरभाऊंनी कौतुकानं तिला वामनरावांच्या निमंत्रणाचा आणि नाश्त्याचा सगळा किस्सा सांगितला. बायकोनं कपाळावर हात मारून घेतला. “अहो, आमच्या महिला मंडळात प्रमिलावहिनी एक पैज हरल्या. त्या बदल्यात एक दिवस तुम्हाला जेवण देईन, असं कबूल केलं होतं त्यांनी. आज नेमका मी घरी नसल्याचा मुहूर्त साधलाय. फसवलं आपल्याला!“ `अगं, काही का असेना, नाश्ता तरी दिला ना? मटार एवढे महाग असताना त्यांनी दोन मटार करंज्या खायला घातल्या मला!“ दिनकरभाऊंनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. “अरे देवा! मटार करंज्याच का? अहो, काल मटार स्वस्त मिळाले, म्हणून मीच घेऊन आले होते त्यांच्यासाठी!“ बायकोच्या या खुलाशावर प्रतिक्रिया द्यायला दिनकरभाऊ समोर नव्हते.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- आवरणासाठी
- १ वाटी मैदा
- अर्धी वाटी रवा
- २-३ चमचे तेल
- मीठ
- सारणासाठी
- २ वाटी मटार
- २ लहान बटाटे अर्धवट उकडून
- २-३ हिरव्या मिरच्या
- २ लसूण पाकळ्या
- १ लहान चमचा मिरपूड
- गरम मसाला चवीनुसार
- फोडणीसाठी
- ३ चमचे तेल, १/२ चमचा जिरे, चिमूटभर हिंग, १/२ चमचा हळद
- ३-४ पाने कढीपत्ता (चिरून घ्यावा)
- मीठ
- तळण्यासाठी तेल
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- आवरणासाठी मैदा आणि रवा एकत्र करावे. 3 चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालावे. चवीपुरते मीठ घालून घट्ट मळून घ्यावे.
- भिजण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवावे.
- बटाटे सोलून लहान लहान फोडी कराव्यात.
- फ्राइंग पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून परतावे. गरम मसाला घालावा.
- मटार घालावेत. वाफ काढावी. मध्ये मध्ये ढवळत राहावे.
- मटार शिजत आले कि बटाट्याच्या फोडी घालाव्यात. मिरपूड घालावी
- डावाने किंवा मॅशरने मटार व बटाटा चेपून सारण एकजीव करावे. वाफ आणून गॅस बंद करावा
- मिश्रण गार होऊ द्यावे
- भिजवलेल्या पीठाचे सुपारीएवढे गोळे करावेत.
- पुरी लाटून त्यात सारण भरावे आणि करंजी करावी.
- कढईत तेल गरम करून करंज्या गोल्डन ब्राऊन रंगाच्या तळून काढाव्यात.
[/one_third]
[/row]