[content_full]
मेथी ही रूढ अर्थाने एक नापास भाजी आहे. एखाद्या हुशार वर्गातल्या `ढ` मुलासारखी मेथीची अवस्था असते. त्या `ढ` मुलाला नक्की काय कळतं आणि कळत नाही, त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, याच्याशी कुणाला काही देणंघेणं नसतं. कुठलाही प्रश्न विचारला, की त्याच्याकडून उत्तर अपेक्षित नसतं. कुठल्या उपक्रमात, प्रदर्शनात, कलेच्या सादरीकरणात त्याचा सहभाग अपेक्षित नसतो. खरंतर त्याचं वर्गातलं अस्तित्त्वच कुणी दखल घेण्यासारखं नसतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यानं स्वतःहून हात वर केला, तरी त्याच्याकडे लक्ष जात नाही. दखल घेतली गेलीच, तर ती कुचेष्टेच्या स्वरूपात असते. त्याला योग्य उत्तर माहीत नसणार, हे आधीच गृहीत धरलेलं असतं. त्यानं अनपेक्षितपणे योग्य उत्तर दिलंच, तरी त्यात काहीतरी खोट काढली जाते. त्यानं कुणाचं तरी कॉपी केलं असेल, किंवा कुणीतरी त्याला सांगितलं असेल, असंच गृहीत धरलं जातं आणि स्वतःच्या गुणवत्तेबद्दलही त्याला मार खावा लागतो. मेथीचंही तसंच आहे. बिचारी मंडईत सगळ्या भाज्यांबरोबर ऐटीत टोपलीत बसली, तरी तिच्याकडे फारशी कुणाची नजर जात नाही. ती जेव्हा स्वस्त असेल, तेव्हा तिची दखल घेतली जाते. घेणारीलाही माहीत असतं, की “शी! मेथी काय केलेयंस गं?“ हेच उद्या आपल्याला घरी ऐकावं लागणार आहे. बिचारी. एवढी उपयुक्त असूनही कायमच दुर्लक्षित. काय तर म्हणे उग्र वास येतो! काही लोक तर असे आहेत, की त्यांना दुसऱ्याच्या घामातून त्यानं आज मेथी खाल्ली होती, हे कळतं. म्हणजे अशी रंध्रांरंध्रांपर्यंत पोहोचलेली मेथी प्रतिष्ठित भाज्यांच्या यादीत मात्र कधीच स्थान मिळवू शकत नाही. तिचं महत्त्व कळतं घरातल्या सगळ्या इतर भाज्यांचा कंटाळा आल्यावर. मग मेथीचे मुठीये केले जातात, पराठे नाहीतर ठेपले होतात किंवा साधी कांदा घालून मेथीची भाजीही मिटक्या मारत खाल्ली जाते आणि तेव्हा मेथीचा अव्वल दर्जा कळतो. आज बघूया, मेथीच्या ठेपल्यांची पाककृती.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- १ जुडी मेथीची कोवळी भाजी
- कणीक
- एक वाटी हरभरा डाळीचे पीठ
- १/४ टिस्पून ओवा
- हिरव्या मिरच्या चवीनुसार
- लसूण
- हळद
- २-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
- थोडेसे तेल
- चवीपुरते मीठ
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- मेथीची भाजी धुवून चिरून घ्यावी.
- एका भांड्यात चिरलेली मेथी आणि साधारण १/२ टिस्पून मीठ घालून किंचित कुस्करून घ्यावी. १५-२० मिनिटे झाकून ठेवावे. थोड्यावेळात मेथीला किंचित पाणी सुटेल.
- त्यात मावेल एवढी कणीक, डाळीचे पीठ, ओवा, मिरच्या व लसूण पेस्ट, हळद, मीठ, तेल घालून पोळ्यांच्या कणकेप्रमाणे भिजवावे. पाणी वापरू नये.
- पीठ चांगले मळून घ्यावे. पोळ्या करतो तसे लाटून घ्यावे. थोडे तेल घालून दोन्ही बाजू नीट भाजून घ्याव्यात.
- गरम गरम ठेपला चटणीबरोबर सर्व्ह करावा.
- ठेपला फुगत नाही. हे ठेपले १०-१५ दिवस टिकतात.
[/one_third]
[/row]