[content_full]
कुणीसं म्हटलं आहे, ‘संसारासाठी किती हाल, कितीही खाव्या खस्ता, निघावे घरून सकाळी, करून भरपेट नाश्ता.’ खरं सांगू का, हे कुणीसं वगैरे काही नाही, मीच आत्ता म्हटलंय. पण पु.ल. म्हणतात, तसं आपल्याकडे काय म्हटलंय याच्यापेक्षा कुणी म्हटलंय, याला जास्त महत्त्व असल्यामुळे काय म्हटलंय, याच्यापेक्षा कुणी म्हटलंय कळल्याशिवाय कान टवकारले जात नाहीत. आता इंटरनेट वाचकांच्या शब्दांत सांगायचं, तर डोळे विस्फारले जात नाहीत, असं म्हणायला हवं. तर मंडळी, आज आपण नाश्त्याचा एक वेगळा पदार्थ माहिती करून घेऊया. मेथीचे मुठीये. मेथी म्हटल्यावर लगेच नाकं मुरडण्याची गरज नाही. हा पदार्थ खरंच चविष्ट आणि रुचकर आहे. मेथी हा काही फार उत्साहानं खाण्यासारखा किंबहुना चर्चा करण्यासारखा प्रकार नाही, हे मान्य, पण तसं तर अंघोळसुद्धा करण्याचा आपल्याला रोज कुठे उत्साह असतो? लोकलज्जा म्हणा, औपचारिकता म्हणा किंवा दिनक्रमाचा एक भाग म्हणूनसुद्धा अंघोळ करणारे काही महाभाग असतातच की! तर, मेथीची भाजी हा असाच एक कमी पसंतीचा प्रकार असला, तरी तो अतिशय औषधी आणि शरीलाला उपायकारकही आहे. प्रथिनं (प्रोटीन्स), फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, लोह, असे काही हितकारक घटक असतात. सौंदर्य वाढवणं, प्रकृती उत्तम ठेवणं, रक्त शुद्ध करणं, अशी कामंही मेथी करू शकते. आता ती आपल्यासाठी एवढं करत असेल, तर आपण तिच्याकडे अगदीच पाठ तरी कशाला फिरवायची? मेथीचे पराठे तर लोकप्रिय आहेतच. आज शिकूया मेथीचे मुठीये करण्याची पाककृती. मुठीतून साकारला जाणारा पदार्थ म्हणून ह्याचं नाव `मुठीये.`
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- 1 मध्यम आकाराची मेथीची जुडी
- अर्धी वाटी रवा
- 1 वाटी डाळीचे पीठ
- 1 चमचा कॉर्नफ्लोअर
- 1 चमचा हळद
- 2 चमचे लाल तिखट
- चिमूटभर हिंग
- मीठ चवीनुसार
- तळण्यासाठी तेल
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
मेथीची फक्त पानं घेऊन ती धुवून घ्यावीत. ती पानं कोरडी होऊ द्यावीत. नंतर त्यात रवा, डाळीचे पीठ, कॉर्नफ्लोअर, हळद, तिखट, मीठ, हिंग घालावे. पीठ घट्ट भिजवावे.
कढईत तेल तापत ठेवावे. तेल चांगले तापले की त्यात भिजवलेले पीठ हातात घेऊन त्याची मूठ वळवावी आणि तो मुटका (हाताच्या मुठीत तयार झालेला गोळा) तेलात सोडावा. चांगला खरपूस तळावा आणि गरमागरम खायला द्यावा.
[/one_third]
[/row]