Misal Rassa Recipe : मिसळ हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. मिसळ हे नाव जरी कानावर पडले तरी तोंडाला पाणी सुटतं. अनेक जण मिसळ सहसा बाहेर खातात पण तुम्ही कधी घरी मिसळ बनवली आहे का? मिसळ घरी बनवायचा विचार केला तरी मिसळ रस्सा स्वादिष्ट बनत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. तुम्हालाही झणझणीत मिसळ रस्सा बनवता येत नाही? टेन्शन घेऊ नका. आज आपण जास्त मेहनत न घेता मिसळ रस्सा घरच्या घरी कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत.

युट्युबवर MadhurasRecipe या अकाउंटवर १० मिनिटांत बनवता येईल अशी मिसळ रस्साची रेसिपी सांगितली आहे. जाणून घेऊ या ही रेसिपी

व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –

आज आपण अशियय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी मिसळ कशी बनवायची, ते जाणून घेणार आहोत. जेव्हा आपण मिसळचा विचार करतो, कटचा विचार करतो, तेव्हा योग्य प्रमाणात साहित्य वापरणे आवश्यक असते. त्यामुळे त्याला अस्सल मराठी चव येते. त्यामुळे साहित्य कोणते आहेत, ते जाणून घेऊ या.

साहित्य

  • तेल
  • मोहरी
  • जिरे
  • कढीपत्ता
  • बारीक चिरलेला कांदा
  • कांदा लसूण मसाला
  • लाल तिखट
  • बेसन
  • १०० ग्रॅम मोड आलेली मटकी
  • मीठ

कृती

एका कुकरमध्ये चार चमचे तेल घाला व तेल गरम करा.
तेल गरम झाले की त्यात मोहरी टाका.
मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाका. चिमुटभर हिंग टाका.
त्यानंतर त्यात कढीपत्ता आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाका.
सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घेऊ या.
त्यानंतर त्यात दोन चमचे कांदा लसूण मसाला घाला. त्यानंतर त्यात लाल तिखट घाला.
सर्व मिश्रण एकत्र करा. त्यानंतर त्यात एक चमचा बेसन घाला. बेसन नीट मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात १०० ग्रॅम मोड आलेली मटकी घाला आणि मटकी पण नीट मिक्स करा.
त्यात भरपूर पाणी घाला. त्यात चवीनुसार मीठ घाला. त्यानंतर कुकरचं झाकण लावा. शिट्टी काढण्याची गरज नाही.
मध्यम आचेवर दहा ते पंधरा मिनिटे मटकी शिजवून घेऊ या. मिसळ रस्सा तयार होईल.

मिसळ रस्सा तयार झाली की तुम्ही मिसळ प्लेट उत्तम पद्धतीने सजवू शकता. मिसळ रस्साबरोबर फरसाण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक शेव, लिंबू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावच्या मदतीने तुम्ही अस्सल मराठमोळ्या मिसळचा आनंद घेऊ शकता.