[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वयंपाक करता येणं ही फक्त एक कलाच नाही, तर ते एक मनोरंजनाचं, विरंगुळ्याचं साधनही आहे. आपल्याला मनोरंजन हवं असेल, तर आपण काय करतो? आवडीचं गाणं लावतो, आवडीच्या सिनेमा किंवा नाटकाला जातो, टीव्हीवरचा आवडीचा कार्यक्रम बघतो, आवडीच्या लोकांना फोन करून गप्पा मारतो किंवा त्यांना भेटायला जातो. प्रत्येकाची मनोरंजनाची कल्पना वेगळी असते. स्वयंपाक करणं हा मनोरंजनाचा उत्तम प्रकार आहे. थिएटरच्या काळ्या अंधारात आपण रुपेरी पडद्यावर एक काल्पनिक विश्व बघतो आणि त्यात हरवून जातो, त्यामागे एक कारण मनोरंजन हे असतंच, पण दुसरं असतं ते म्हणजे आपण त्या भावभावनांशी एकरूप होणं. पडद्यावरच्या हिरोनं व्हिलनची धुलाई केली, की आपल्यालाही आपल्या आयुष्यातल्या अनेक दुष्ट, वाईट लोकांना धडा शिकवल्याचा अनुभव येतो. हिरोच्या रूपात आपण स्वतःला बघतो आणि मनातल्या मनात अनेक दुष्ट प्रवृत्तींचं निर्दालन करून टाकतो. स्वयंपाकाचंही तसंच असतं. मिरचीची देठं काढून आपण ती कुटतो, वाटतो, तेव्हा एखाद्या उद्दाम आजी-माजी बॉसलाच वरवंट्यात घालून कुटल्याचा फील येतो. लसणीची सालं काढून आपण तिला ठेचतो, तेव्हा पैसे बुडवणाऱ्या एखाद्या निर्लज्ज जुन्या मित्राला बदडून काढल्यासारखं वाटतं. टोमॅटो कापून आपण तो स्मॅश करतो, तेव्हा लहानपणी खेळात आपल्याला सतत चेपवणाऱ्या एखाद्या दांडगट सवंगड्याला कोपऱ्यात घेऊन बुकल बुकल बुकलल्याचा अनुभव येतो. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातल्या बऱ्या वाईट घटनांशी स्वयंपाकातल्या प्रत्येक कृतीचा संबंध जोडून हा आनंद मिळवू शकतो. अर्थात, ही हिंसा फक्त काल्पनिक आणि प्लॅटोनिक पातळीवरची असल्यामुळे, तिला एरव्हीचे मापदंड लागू होत नाहीत. एकदा हा फील घेत स्वयंपाक करून बघा, म्हणजे कुठल्याही पदार्थाची चव आणखी वाढेल. हां, रोज घालूनपाडून बोलणाऱ्या बायकोच्या किंवा सासूच्या बाबतीत तुम्हाला अशी काही कल्पना करायची असेल, तर ती कृपया आपापल्या जबाबदारीवर करावी!

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • १/२ वाटी मूग डाळ
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • १/४ वाटी चिरलेली कोथिंबीर
  • ७ ते ८ लसूण पाकळ्या
  • १/२ टी स्पून जिरे
  • १/४ टी स्पून हिंग
  • १/२ टिस्पून हळद
  • १/४ टी स्पून मिरपूड
  • चवीपुरते मीठ
  • तळण्यासाठी तेल

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • मूग डाळ ३-४ तास पाण्यात भिजत ठेवावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे. पाणी न घालता डाळ बारीक वाटून घ्यावी.
  • मिरची आणि लसूण पेस्ट करून घ्यावी.
  • वाटलेल्या डाळीत मिरची-लसूण पेस्ट, कोथिंबीर, जिरे, हिंग, हळद, मिरपूड आणि चवीपुरते मीठ घालावे.
  • मध्यम आचेवर कढईत तेल तापत ठेवावे. चमच्याने किंवा हाताने मिश्रणाचे छोटे गोळे तेलात सोडावेत. गोल्डन ब्राऊन रंग आला की थोडावेळ कागदावर काढून अधिकचे तेल काढून टाकावे.
  • हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंच, गूळ, खजूराच्या गोड चटणीबरोबर गरमागरम भजी खावी.

[/one_third]

[/row]