[content_full]
काही पदार्थांचं स्थानमाहात्म्य एवढं असतं, की त्या गावांची नावं त्या पदार्थांशी कायमची जोडली जातात. कित्येक पिढ्या बदलल्या, तरी त्यांची लोकप्रियता कमी न होता उलट वाढत जाते आणि चव दर कैकगुणित होत जाते. ते पदार्थ त्या गावातच जन्माला आले का, इतर कुठे तशा पद्धतीचे पदार्थ बनत नाहीत का, या गोष्टींना फारसं महत्त्व राहत नाही. कर्जतलाच वडापाव का मिळतो, लोणावळ्यातच चिक्की का तयार होते, पनवेललाच समोसे का मिळतात, साताऱ्यालाच कंदी पेढे का, नरसोबाच्या वाडीचीच बासुंदी उत्तम का, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची अरसिकता दाखवणं हा शुद्ध वेडेपणा आहे. त्याच ठिकाणच्या चवीचं पावित्र्य राखायचं आणि तिथे जायची संधी मिळाली, की तो पदार्थ आवर्जून चाखायचा, यातच खरा आनंद असतो. त्यासाठी मुद्दाम वाट वाकडी करून त्या गावात जाणं होतं, त्या गावातून येणाऱ्या माणसाकडून तो पदार्थ आवर्जून मागवून घेतला जातो, यातच सगळं आलं.
सोलापुरी शेंगदाणा चटणी, नागपुरी ठेचा जसा लोकप्रिय आहे, तेवढाच प्रसिद्ध आहे नाशिकचा चिवडा. दिवाळीत फराळाच्या पदार्थांमध्ये सगळ्यात भाव खाऊन जातो चिवडा. कारण हा लाडू, करंजी, चकली, अशा कुठल्याही कॉंबिनेशनबरोबर चालतो आणि तोंडाला चव आणतो. चिवडा हा पोटभरीचा पदार्थ असला, तरी तो डिशमध्ये घेऊन खाण्यापेक्षा येता जाता डब्यात हात घालून त्याचा बकाणा भरण्यात जी मजा असते, ती दुसऱ्या कशात नाही. मग त्यासाठी कितीही आणि कुणाचाही ओरडा खावा लागला, तरी बेहत्तर! तर यावेळी अशाच चविष्ट आणि चटकदार नाशिक चिवड्याची बनविण्याची पद्धत बघूया.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- अर्धा किलो भाजके पोहे
- पाऊण किलो तेल
- साखर
- सुक्या खोबऱ्याचे काप एक वाटी
- दीड वाटी शेंगदाणे
- दीड वाटी डाळे
- अर्धा किलो कांदे
- तिखट
- मीठ
- तीन-चार आमसुले
- लवंग, दालाचिनी, जिरे, शहाजिरे, धने, तमालपत्र, दगडफूल, मिरे, बडीशेप, तीळ हिंग हे सर्व मसाल्याचे पदार्थ प्रत्येकी १० ग्रॅम
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- प्रथम कांदा उभा चिरून, उन्हात वाळवून घ्यावा.
- वर लिहिलेले मसाल्याचे साहित्य प्रत्येकी समप्रमाण घेऊन, ते सर्व जिन्नस तेलावर वेगवेगळे भाजून एकत्र बारीक करावेत आणि त्याचा मसाला तयार करून घ्यावा.
- खोबऱ्याचे काप करून घ्यावेत.
- पोहे निवडून घ्यावेत.
- तेल घेऊन त्या तेलात कांद्याचे काप, खोबऱ्याचे काप, आमसुले व शेंगदाणे वेगवेगळे तळून घ्यावेत
- नंतर तेल खाली उतरवून, त्या तेलात चवीप्रमाणे मीठ व तिखट, हळद, तळलेली आमसुले बारीक चुरून घालावीत.
- तयार केलेला मसाला, दाणे, खोबऱ्याचे काप, कांद्याचे काप व डाळे हे सर्व घालून चांगले कालवावे.
- पोहे आणि चवीनुसार साखर घालून परत चांगले एकत्र कालवावे. चिवडा तयार.
[/one_third]
[/row]