वेगवेगळ्या संस्कृती एकत्र नांदत असलेल्या सोलापूर या शहराची खाद्यसंस्कृतीही श्रीमंत आहे. सोलापूरची बाजार आमटी ही गेल्या कित्येक दशकांपासून फेमस आहे. याला पंढरपूर स्पेशल बाजार आमटीही म्हणतात. ही रेसिपी चवीला खूप स्वादिष्ट लागते. त्यामुळे ही मराठमोळी रेसिपी घरात नक्की करून बघा. चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी
बाजार आमटी साहित्य:
- मटकी डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ, मुग डाळ प्रत्येकी दोन मोठे चमचे
- काळे तिखट दोन टेबलस्पून
- गरम मसाला दोन टेबलस्पून
- धने जिरे पावडर प्रत्येकी दोन टेबल स्पून
- ब्याडगी मिरचीचे लाल तिखट दोन टेबलस्पून (तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा)
- सुके खोबरे दोन टेबल स्पून
- कढीपत्ता सात ते आठ पाने, कोथिंबीर अर्धी वाटी
- दोन कांदे, दोन टोमॅटो
- लसूण पाकळ्या १४ ते १५
- आल्याचा कीस एक टेबलस्पून
- गोडेतेल एक मोठी वाटी
बाजार आमटी कृती:
- प्रथम सर्व डाळी स्वच्छ धुऊन एकत्र करा. त्यात हिंग अर्धा टी स्पून, हळद अर्धा टी स्पून व डाळी पुरते पाणी घाला व कूकरमध्ये मऊ शिजवून घ्या.
- मिक्सरमध्ये कांदे, टोमॅटो व कोथिंबिरीच्या ५-६ काड्या घालून त्याची पेस्ट करून घ्या.
- आले लसूण व सुके खोबरे बारीक वाटून घ्या. घरी दगडी खलबत्ता उपलब्ध असल्यास त्याचा वापर केल्यास आमटीला एक वेगळीच चव येते. खलबत्ता नसल्यास मिक्सर वापरा.
- पातेल्यात वाटीभर तेल घालून ते तापले की मोहरी, हिंग, किंचीत हळद,जिरे घालून फोडणी करा. आता आले व लसूण यांची पेस्ट घाला. पेस्ट गुलाबी होईपर्यंत परता.
- नंतर यामध्ये कढीपत्ता व कांदा टोमॅटोची पेस्ट घाला. कांद्याला तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतायचे आहे.
- आता काळा मसाला, लाल तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला घाला. घातलेल्या सर्व मसाल्यांचा लालसर रंग येईपर्यंत हे मिश्रण खमंग परता.
- दीड लिटर पाणी घेऊन ते उकळा. हे उकळलेले पाणी पातेल्यातील मिश्रणात घालायचे आहे. आधणाचे पाणी घातल्याने सर्व मसाल्यांची चव पटकन एकत्र येते. आता चवीनुसार त्यात मीठ घाला.
- हे आमटीचे पाणी उकळल्यावर त्यात मिश्र डाळींचे वरण घोटून घाला. आता निवांतपणे आमटी चांगली खदखद उकळू द्या.
- ही आमटी थोडीशी पातळच करायची असते. पाण्याचे प्रमाण थोडेसे अधिक राखले तरी चालते. आमटी भाकरी किंवा भात कशाबरोबरही खाऊ शकता.
हेही वाचा >> भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा झणझणीत चमचमीत गावरान “चुनवडी”
ही आमटी खूप स्वादिष्ट लागते. त्यामुळे ही मराठमोळी रेसिपी घरात नक्की करून बघा.