[content_full]
बेबी मावशी आणि ताई मावशीचं फार सख्यही नव्हतं आणि अगदीच भांडणही. दोघी एकाच आईच्या लेकी असल्या, या ना त्या निमित्तानं एकत्र येत असल्या, तरी त्यांच्यात फारसा सलोखा नव्हता. “बेबी भयंकर चिकट आहे. एक वस्तू सुटत नाही तिच्या हातनं!“ असा ताईचा आरोप होता, तर “ताई प्रचंड मी-मी करणारी आहे, तिला स्वतःच्या पलीकडे काही दिसत नाही,“ असा बेबीचा दावा होता. कुठलीही नवी वस्तू आणायची, घरात काही करायचं तर आधी ताईचा सल्ला घेतला जायचा. तिची आवडनिवड पाहिली जायची. धाकटी म्हणून बेबीचे मात्र कधी लाड झाले नाहीत. उलट तिला मोठ्या भावंडांचीच पुस्तकं, कपडे वापरावे लागले. काहीही नवीन घेताना `बेबीला काय कळतंय,“ असं म्हणून तिला गृहीत धरलं जायचं. अगदी लग्नाच्या वेळेपर्यंत हीच प्रथा सुरू होती. धाकटी म्हणून बेबी सगळ्यांची हक्काची गिऱ्हाईकही होती. अगदी मोठ्या झाल्यानंतरही कुठल्या सणसमारंभाला दोघी बहिणी एकत्र आल्या, तरी जास्त बोलायच्या नाहीत. बाहेर आपल्यात वाद असल्याचं दाखवायच्या नाहीत, पण त्यांचे `मधुर संबंध` सगळ्यांनाच माहिती होते. आपापले गुण वेगळे आहेत आणि आपण आपल्या जागी श्रेष्ठ आहोत, यावर त्या दोघी ठाम होत्या. उलट त्या दोघी एकत्र आल्या, तर खूप वेगळं काहीतरी करून दाखवू शकतील, असा इतरांना विश्वास होता, पण ते फक्त दिवास्वप्न होतं. त्या दिवशी मात्र चमत्कार घडला. मामानं भाऊबीज म्हणून दोघींना साड्या घ्यायचं ठरवलं आणि त्या दोघींच्या पसंतीनं साड्या घेतल्या, तर त्या म्हणतील तेवढ्या आणि म्हणतील त्या किमतीच्या साड्या त्यांना भाऊबीज म्हणून देईन, असं मामानं सांगितलं. त्या दिवशी दोघीही मावश्या हातात हात घालून आनंदात खरेदीला गेल्या आणि दिवसभर सगळा बाजार पालथा घालून, येताना उत्तम प्रतीच्या साड्या, अगदी रास्त किमतीत घेऊन आल्या. मामाचं काम अगदीच बजेटमध्ये झालं. त्यानं आजीला धन्यवाद दिले. आजी म्हणाली, दोघी माझ्याच लेकी आहेत. त्यांना कसं एकत्र आणायचं, हे माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहीत असणार?“ चीज आणि पनीर कसं, दुधापासूनच बनतं, पण दोघांची जागा वेगवेगळी. दोघांची चव वेगवेगळी. त्यावरून त्यांच्यात सतत धुसफूस असतेच. पण दोघं एकत्र असले, तर पदार्थाला काय चव आणतात, नाही? चला, मग या दोघांची एकत्र चव चाखण्यासाठी करून बघायचा, हा पनीर चीज बॉल?
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- २०० ग्राम किसलेले चीज
- पाव किलो पनीर
- अर्धा चमचा बेकिंग पावडर
- ५-६ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- चार चमचा मैदा
- कोथिंबीर, मीठ.
- कॉर्नफ्लोअर
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- चीज आणि पनीर किसून घ्यावे.
- त्यात बेकिंग पावडर, मैदा, मिरच्यांचे बारीक तुकडे, चिरलेली कोथिंबीर, मीठ घालून नीट मळून घ्यावे.
- त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावेत.
- कोरड्या कॉर्नफ्लोअर मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत.
- सॉस क़िवा पुदीना चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करावेत.
[/one_third]
[/row]