How to make panipuri at home : रविवार म्हणजे आराम आणि सुट्टीचा वार. ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे आहे, अशी मंडळी सुट्टीच्या दिवशी जरा हटके, कधी न बनवलेले किंवा काहीतरी खास पदार्थ बनवून पाहत असतात. त्यामुळे आज खास ‘संडे स्पेशल’ म्हणून चटपटीत, झणझणीत आणि कुरकुरीत अशी पाणीपुरी घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत.
घरी पुरी पासून ते तिखट पाण्यापर्यंत ही चटपटीत पाणीपुरी कशी बनवायची याची सोपी रेसिपी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @natashaagandhi नावाच्या अकाउंटने व्हिडिओमार्फत दाखवली आहे. चला तर पटापट रेसिपी पाहा आणि घरीच पाणीपुरीचा बेत बनवा.
पाणीपुरी रेसिपी
साहित्य
२ कप रवा
१/४ कप मैदा
पुदिना
कोथिंबीर
आले
मिरची
गूळ
पाणीपुरी मसाला
काळे मीठ
जिरे पूड
चिंच
आमचूर पावडर
चिंचेची चटणी
मीठ
बर्फ
कृती
-सर्वप्रथम पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या बनवण्याची कृती पाहू.
- एका बाऊलमध्ये २ कप रवा, १/४ कप मैदा आणि चवीपुरते मीठ घालून, नेहमी कणिक मळतो तशी पुऱ्यांची कणिक मळून घ्या.
- ही कणिक काहीचे मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेऊन द्या. यामुळे पुऱ्यांची कणिक छान मऊ होईल.
- आता पुऱ्यांचे लहान लहान गोळे करा आणि ते लाटून घ्या.
- पुऱ्या तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल तापत ठेवा.
- तेल कडकडीत तापल्यानंतर हळूहळू त्यामध्ये लाटलेल्या पुऱ्या सोडून द्या.
- पुऱ्या टम्म फुगून, त्यांना सोनेरी रंग आल्यानंतर झाऱ्याच्या मदतीने तयार पुऱ्या एका टिशू पेपर घेतलेल्या पातेल्यात/ परातीती काढून घ्या.
- तयार आहेत आपल्या पाणीपुरीच्या कुरकुरीत आणि खुसखुशीत पुऱ्या.
हेही वाचा : Recipe : मैद्याचा जराही वापर न करता, घरीच बनवा स्वादिष्ट मोमो! रेसिपी पाहा
आता या पुरीमध्ये भरल्या जाणाऱ्या झणझणीत अशा तिखट किंवा हिरव्या पाण्याची कृती पाहू.
- मिक्सरच्या मोठ्या भांड्यात, एक कप पुदिन्याची पाने घालून घ्या.
- त्यामध्ये पाव कप कोथिंबी, आल्याचा तुकडा, २ ते ३ तिखट हिरव्या मिरच्या आणि ३ चमचे गुळ घालून सर्व पदार्थ व्यवस्थित वाटून घ्या.
- तुम्हाला पाणी गार हवे असल्यास यात बर्फाचा वापर करू शकतो.
- मिक्सरमधून वाटून घेतलेले तिखट पाणी एका मोठ्या गाळण्याच्या मदतीने एका बाऊलमध्ये गाळून घ्या.
- वाटून घेतलेल्या या तिखट पाण्यामध्ये एक चमचा पाणीपुरी मसाला, अर्धा चमचा काळे मीठ, अर्धाचमचा जिरे पूड घालून घ्या.
- त्याबरोबरच एक छोटा चमचा आमचूर पावडरदेखी घालून घ्या.
- सर्व पदार्थ पाण्यामध्ये एकत्र करून व्यवस्थित ढवळून घ्या.
तुम्हाला पाणीपुरीचे पाणी अगदी तिखट नको असल्यास –
तयार केलेल्या तिखट पाण्यामध्ये दोन चमचे चिंचेची गोड चटणी घालून पाणी व्यवस्थित ढवळून घ्या.
आता आपल्या कुरकुरीत पुऱ्या आणि पाणी तयार आहे. या टम्म फुगलेल्या पुऱ्यांमध्ये तुम्हाला आवडेल तसे, उकडलेले मूग, बटाटा, किंवा रगडा अशा पाणीपुरीचत भरल्या जाणाऱ्या मसाल्याचा भरून, तिखट आणि आंबट-गोड पाण्यासह आपल्या घरगुती स्वादिष्ट अशा पाणीपुरीचा आस्वाद घ्या.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @natashaagandhi नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या रेसिपीला २ मिनियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.