आमरस, श्रीखंड किंवा या पदार्थांबरोबर पोळी खाण्यापेक्षा सर्वांनाच पुरी खाणे पसंत पडते. मग उन्हाळ्याच्या दिवसांत, एखादा सुटीचा वार पाहून, घरात गरमागरम खुसखुशीत पुऱ्या आणि आमरस, असा जबरदस्त बेत हमखास केला जातो. मात्र, अनेकदा तळून ठेवलेल्या पुऱ्या जेवणाच्या ताटात वाढेपर्यंत चपट्या होऊन जातात किंवा त्या फुगलेल्या राहत नाहीत.
मात्र, यूट्युबवरील vmiskhadyayatra103 नावाच्या चॅनेलने पुऱ्या कशा बनवायच्या आणि त्या शेवटपर्यंत टम्म फुगलेल्या कशा ठेवायच्या याबद्दल एक भन्नाट टीप शेअर केली आहे. आमरसाबरोबर खमंग, खुसखुशीत व टम्म फुगलेल्या पुऱ्या हव्या असतील, तर ही रेसिपी आणि टीप लगेच पाहा.
खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या पाहा :
साहित्य
२५० ग्रॅम – कणीक
१/२ वाटी – बारीक रवा
१/२ वाटी – मैदा
२ चमचे – डाळीचे पीठ / बेसन
साखर
मीठ
तेल
कृती
पुऱ्यांसाठी कणीक मळणे
सर्वप्रथम कणीक, बारीक रवा, मैदा, बेसन असे सर्व कोरडे पदार्थ एका परातीत वा पातेल्यात एकत्र करून घ्या.
त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालून घ्या.
एक ते दोन मोठे चमचे तेल कडकडीत तापवून, तेलाचे मोहन पातेल्यातील एकत्र केलेल्या पिठाच्या मिश्रणात घालावे.
तेल गरम असताना चमचाच्या मदतीने पीठ एकत्र करण्यास सुरुवात करावी. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून, हाताने पुऱ्यांसाठी घट्ट कणीक मळून घ्यावी.
कणीक मळून तयार झाल्यानंतर १० ते १५ मिनिटांसाठी ती झाकून ठेवावी.
पुऱ्या तळणे
तयार केलेल्या कणकेचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून, ते एकसमान लाटून घ्या.
एका कढईत पुऱ्या तळण्यासाठी तेल तापत ठेवा. तेल कडकडीत गरम झाले की, पुऱ्या तळण्यास सुरुवात करा.
पुऱ्या टम्म फुगून, त्यांना गुलाबी-सोनेरी रंग आल्यानंतर झाऱ्याच्या मदतीने कढईतील पुरी काढून टिशू पेपरवर ती काढून घ्यावी. त्यामुळे पुरीतील अतिरिक्त तेल टिपून घेण्यास मदत होते.
पुऱ्या टम्म फुगून राहण्यासाठी टीप –
तळलेल्या पुऱ्या पानात वाढेपर्यंत त्या टम्म फुगलेल्या ठेवण्यासाठी अतिशय सोपा उपाय आपण पाहणार आहोत.
त्यासाठी केवळ एका टूथपिक किंवा दात कोरणीची आपल्याला आवश्यकता आहे.
सर्व पुऱ्या तळून झाल्यानंतर, एका टूथपिकने त्या पुऱ्यांच्या बरोबर मध्यभागी टोचून, पुऱ्यांना लहानसे छिद्र करावे.
त्यामुळे पुऱ्यांमधील हवा बाहेर पडून पुऱ्या आहेत त्याच आकारात राहू शकतात.
बोनस टिप्स –
- पुऱ्यांची कणीक मळताना त्यामध्ये मोहन / तेल कमी पडल्यास पुऱ्या लोचट होऊ शकतात. त्यामुळे पुऱ्यांची कणीक मळताना तेलाचा कायम योग्य प्रमाणात वापर करावा.
- पुऱ्या लाटताना त्या पातळ वा खूप जाड लाटू नयेत. अतिशय पातळ लाटलेल्या पुऱ्या फुगणार नाहीत.
यूट्यूबवरील vmiskhadyayatra103 या चॅनेलवरून पुऱ्यांची ही रेसिपी आणि पुरी टम्म फुगलेली राहण्यासाठी भन्नाट टिप्सचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.