[content_full]
शेजारी राहायला पाटलांची मांजर एक नंबरची चोरटी होती. देशपांडे काकू तिच्यावर आठ दिवसांतच वैतागल्या होत्या. खरंतर सोसायटीला मांजरांची सवय नव्हती, असं नाही. पण आधीच्या मांजरी सोसायटीतल्या सदस्यांच्या स्वभावाप्रमाणेच नाकासमोर चालणाऱ्या आणि शांत स्वभावाच्या होत्या. कुणाच्याही घराच्या दाराशी उभं राहून `म्यांव` केलं, तरी दूधदुभतं भरपूर मिळत होतं. अध्येमध्ये आईस्क्रीम, वडापावचा नैवेद्यही ठरलेलाच. बाकी सणासुदीला उंदीर, घूस, कबूतर वगैरे जे काही त्या त्या दिवसाच्या मूडनुसार आणि उपलबद्ध संधीनुसार मटकवायचं, ते साहित्यही मुबलक उपलब्ध होतं. त्यामुळे कधी एकवेळ कित्येक (प्राणी, पक्षी) हत्या केल्या, तरी चोरी करण्याचं पातक त्या सोसायटीतल्या मांजरांच्या माथी कधी लागलं नव्हतं. पलीकडच्या फ्लॅटमध्ये पाटील कुटुंब राहायला आलं आणि त्यांच्या बरोबर आलेल्या मांजरानं सोसायटीची सगळी शिस्त बिघडवली. कधीही कुणाच्याही घरात घुसून दूध, दह्यावर ताव मारायला ही मांजर सवकली होती. एखाद दिवशी तिची (आणि तिच्या मालकिणीची!) खोड जिरवायचीच, असं देशपांडे काकूंनी ठरवून टाकलं होतं. आणि अखेर तो सुदिन उजाडला. त्या दिवशी काकूंनी घरी सगळ्यांच्या आवडीची फिरनी म्हणजे तांदळाची गोड खीर केली होती. दोन्ही मुलांना ती जास्तच आवडायची, म्हणून संध्याकाळी सगळ्यांनी एकत्रच खायची, असं ठरलं होतं. संध्याकाळी स्वयंपाकघरात इतर तयारी करताना काकूंना जाणवलं, की फिरनीचं पातेलं निम्मं झालेलं आहे. हा पाटील काकूंच्या मांजराचाच अपराध असणार, असं ठरवून देशपांडे काकूंनी आज भांडणच काढलं. सुदैवानं पाटील काकूंनी नमतं घेतलं, माफी मागितली, त्यामुळे `मी खीर खाल्ली तर बुड घागरी`चा प्रयोग त्या मांजरावर करावा लागला नाही. सगळे रात्री एकत्र जेवायला बसले आणि आजीने आजोबांना सवयीप्रमाणे विचारलं, `तुम्हाला हवी तर थोडी वाढते. पण आवडेल ना तुम्हाला?` आजोबा पटकन बोलून गेले, `हो, वाढ की. छान झालेय खीर!` आणि त्याच क्षणी घागरीवर नक्की कुणाला उभं करायचं, हा प्रश्न मिटून गेला.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- १ वाटी चांगल्या प्रतीचा तांदूळ
- ४ वाट्या दूध
- १ वाटी (भरून) साखर
- २ चमचे चारोळ्या व काजूचे काप
- १ चमचा बेदाणा
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- तांदूळ धुवून चाळणीवर तासभर निथळत ठेवावेत. जरा ओलसर असतानाच पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये रवाळ वाटावेत.
- साय न काढता दूध तापत ठेवावे. दूध उकळायला लागले की तांदळाचा रवा त्यात घालावा.
- मध्यम आचेवर सतत ढवळत राहावे. साधारण अर्ध्या तासात रवा मऊसर शिजेल.
- रवा शिजला आहे कि नाही हे बोटाने दाबून बघावे.
- रवा शिजल्यानंतर साखर घालावी व ढवळत राहावे.
- मिश्रण थोडे पातळसर होईल. ते दाटसर होईपर्यंत ढवळावे.
- गॅस बंद करून त्यात वेलचीपूड घालावी.
- गार झाल्यावर चारोळ्या, काजू, बेदाणे घालावेत.
- फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खावी.
[/one_third]
[/row]